COVID-19 : सौदी अरेबियाहून आलेल्या 'त्या' तरुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

सौदी अरेबियातून आलेला आणि लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये उपचार घेणारा येथील एक रुग्ण शहरात आल्याचे वृत्त कळताच प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (ता. 20) त्याची तपासणी झाली. तो निगेटिव्ह असल्याचे सांगत घरी सोडून देण्यात आले. 

नाशिक : (येवला) सौदी अरेबियातून आलेला आणि लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये उपचार घेणारा येथील एक रुग्ण शहरात आल्याचे वृत्त कळताच प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (ता. 20) त्याची तपासणी झाली. तो निगेटिव्ह असल्याचे सांगत घरी सोडून देण्यात आले. दरम्यान, येवल्यात सहा व्यक्ती सौदी अरब, लंडन, दुबई, जर्मनी, अमृतसर येथून परतल्या आहेत. या सर्वांची प्रकृती उत्तम असून, कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नसल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.

कुटुंबीयांकडून तो घरी नसल्याचे सांगण्यात आल्याने अजूनच संशय बळावला

मुंबई विमानतळावर सौदी अरेबियाहून आलेल्या 55 वर्षीय नागरिकाचे 13 मार्चला स्क्रीनिंग झाले होते. 15 मार्चला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने तो प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याला दीर्घकाळापासून फुप्फुसाचा आजार असल्याचे तेथे निष्पन्न झाले. मात्र, कोरोनाची लक्षणे असल्याची शक्‍यता गृहीत धरून त्याला नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला प्रवरा हॉस्पिटलने दिला. त्यासाठी हॉस्पिटलने रुग्णवाहिका देऊ केली. मात्र, त्याने रुग्णवाहिका नाकारून हॉस्पिटलमधून निघून आला होता. याची माहिती गुरुवारी रात्री शहरात समजतात पोलिसांची धावपळ उडाली. रुग्ण घरी असतानाही कुटुंबीयांकडून तो घरी नसल्याचे सांगण्यात आल्याने अजूनच संशय बळावला. 

दुपारी घरी सोडून दिले

शुक्रवारी सकाळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी, हवालदार चंद्रकांत निर्मल यांनी ज्येष्ठ नेते ऍड. माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी माजी नगरसेवक रिजवान शेख, सलीम शेख यांना बोलावून संबंधित कुटुंबाला समजावून सांगितले. त्या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती केली. नंतर संबंधित रुग्णाला पोलिस बंदोबस्तात ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी रुग्णाची तपासणी केली. त्याला कोरोनाची कुठलीही चिन्हे नसल्याचे सांगत दुपारी घरी सोडून दिले. 

हेही वाचा > #COVID19 : गर्दी नको..अन् नको तो कोरोना! लग्नाच्या गाठी बांधून आटोपला घरगुती विवाह सोहळा 

आमच्याकडे तपासणीसाठी आलेल्या संबंधित रुग्णाला फुफ्फुसाचा आजार आहे. त्याला ताप व खोकला येत नसल्याने कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. आता त्याला आम्ही 14 दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. काही त्रास झाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे सांगितले आहे. - डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, येवला  

हेही वाचा >.'घबाड आलं हाती अन् कर्मानं केली माती'...मग काय चांगलीच झाली फजिती!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona check up of youth in Saudi Arabia nashik marathi news