कोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन आलाय का? लग्नसराईच्या 'त्या' तीन दिवसांचे प्रशासनापुढे आव्हान

wedding 1234.jpg
wedding 1234.jpg

नाशिक : राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे धास्तावलेल्या यंत्रणेपुढे कोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन आलाय का, असा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. त्याच वेळी कोरोनाने पाय पसरण्यासाठी कारणीभूत ठरलेली लग्नसराई रविवार (ता. २१)पासून शुक्र अस्तामुळे रामनवमीपर्यंत म्हणजे दोन महिने थांबणार आहे. मात्र, तोपर्यंत येत्या तीन दिवसांमध्ये लग्नांच्या उडणाऱ्या धडाक्याने प्रशासनापुढे कोरोनाविषयक काळजी घेण्याचे आव्हान असेल. 

लग्नसराईच्या तीन दिवसांच्या धडाक्याचे प्रशासनापुढे आव्हान 

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर त्याचे स्पष्टीकरण होईल. मात्र, काही जिल्ह्यांमधून ‘बी अलर्ट’, यंत्रणेला ‘टोनिंग’ करा, प्रतिसाद ‘टोनअप’ करा, असे फर्मान सुटले आहे. धर्मशास्त्राचे अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी गुरू आणि शुक्र अस्तामध्ये शुभ कामांना फाटा दिला जातो, अशी माहिती दिली. खरे म्हणजे, आताच्या शुक्र अस्तामध्ये १७ मेपर्यंत लग्नतिथी दिसत नसल्या, तरीही काही कुटुंबांनी रामनवमीनंतर लग्नाच्या तिथी काढल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना केल्या नसल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. हॉल्स, लॉन्स, मंगल कार्यालयधारकांनी आणि अन्य ठिकाणी कोणताही समारंभ अथवा कार्यक्रम घेत असताना आयोजकांनी उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवायची आहे. शारीरिक अंतर राखावे, सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर बंधनकारक असेल. त्यासंबंधाने उल्लंघन झाल्यास संबंधित लॉन्स, मंगल कार्यालय अथवा ज्या जागेत कार्यक्रम घेतला, अशा जागामालकास आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल.

....तर कठोर कारवाई

गर्दीच्या कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्यातून परवानगी घेणे आवश्‍यक आहे. शिवाय कोरोनाविषयक तरतुदींचे उल्लंघन झाल्यास साथरोग अधिनियम आणि तत्सम कायदेशीर तरतुदीनुसार स्थानिक पोलिस ठाण्यातर्फे कारवाई करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंटेन्मेंट क्षेत्राबद्दल काटेकोर पालन करावे. हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहांकडून नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई केली जाईल. त्याच वेळी कोरोना रुग्णांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या करण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

उभ्या गाड्यांवरून कळतो लग्नाचा थाट 
लग्नाचा किती मोठा थाट आहे, किती लोक आहेत हे तपासायचे झाल्यास लॉन्स, हॉल, मंगल कार्यालय, हॉटेल्सपुढे उभ्या असलेल्या गाड्यांच्या ताफ्यावरून लक्षात येण्यास मदत होते. सद्यःस्थितीत शंभर ते दोनशे जणांच्या मर्यादेत लग्नसोहळा होत असल्याचा दावा केला जात असला, तरीही यंत्रणेतील अनेक अधिकाऱ्यांना पाचशे ते पाच हजारांपर्यंतची गर्दी उघड्या डोळ्यांनी पाहावयास मिळते. हे आता लपून राहिलेले नसल्याने मोठाली लग्ने होऊनही कारवाई होत नसल्याची खंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये लग्नाची ठिकाणे तपासा, मर्यादेपेक्षा अधिक लोक असल्यास नोटीस बजावा, दंड करा आणि सुधारणा न झाल्यास गुन्हा दाखल करा, असे फर्मान सुटले आहे. त्याच वेळी खासगी शिकवण्यांच्या ठिकाणी विद्यार्थी मास्क, सॅनिटायझरचा वापर करताहेत काय? शारीरिक अंतर पाळले जाते आहे काय, याची पडताळणी करून उल्लंघन झाल्यास नोटीस द्या, दंड करा आणि त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करा इतक्या कडक सूचना देत असताना चाचण्या वाढविण्यास यंत्रणेला सांगण्यात आले आहे.

खासगी डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनाची चाचणी करायला सांगावी, लोक सांगूनही ऐकणार नसतील, तर संस्थात्मक विलगीकरण सुरू करा. त्यासाठी कोविड केअर सेंटर, व्हेंटिलेटरची व्यवस्था पडताळून पाहा, एका रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांच्या वीस जणांच्या चाचण्या करा. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास दंड करा, दंडाची निम्मी रक्कम पोलिस दलासाठी आणि निम्मी रक्कम स्थानिक प्रशासनाकडे ठेवावी. हे सारे कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून किमान पावसाळ्यापर्यंत गांभीर्याने घेतले जावे, अशा शब्दांत काही जिल्ह्याच्या प्रशासनाची कानउघाडणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. हे कमी काय म्हणून थेट इमारती ‘सील’ करण्याचे आदेश जारी झाले आहेत. 


नाशिक शहरामध्ये लॉन्स, हॉल्स, मंगल कार्यालयांची संख्या २१० पर्यंत आहे. लग्नाच्या संस्कारासाठी कुटुंबीयांना पहिल्यांदा पोलिसांच्या परवानगीसाठीचा अर्ज दिला जातो. पोलिसांची परवानगी घेतली जाते. मास्क, सॅनिटायझरचा वापर होतो की नाही, शारीरिक अंतर पाळले जाते की नाही याची तपासणी व्यवस्थापनाकडून केली जाते. लग्नाच्या विधी कार्यासाठी कुटुंबातील पाच ते दहा जणांची जवळीक होते. हा अपवाद वगळता वऱ्हाडी मंडळी शारीरिक अंतर पाळतात असा अनुभव आहे. 
-सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्सचालक संघटना  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com