मुलांचाही रोजगार गेला आणि कुटुंबावरही आर्थिक संकट; बेरोजगारीवर मात करत रिक्षाचालकाने लढविली शक्कल

राजेंद्र दिघे
Monday, 28 September 2020

"पंचवीस वर्षांपासून रिक्षा व्यवसायात आहे. कधीही अशी भयानक परिस्थिती आली नाही. कोरोनाच्या भीतीपेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. कुटुंबातील मुलांचाही रोजगार गेल्याने या नव्या व्यवसायाची सुरवात केली. "

नाशिक / मालेगाव कॅम्प : कोरोनाच्या महामारीत जगण्या-मरण्याची समस्या निर्माण झाल्याने सहा महिन्यांत प्रवासी वाहतुकीअभावी रिक्षांना फटका बसला. कलेक्टर पट्टा भागातील देवीदास कोष्टी यांनी आपल्या रिक्षा व्यवसायातून रोजगार हिरावला गेल्याने बेरोजगारीवर मात करत अशी शक्कल लढविली.

आणि ते खचले नाही...
जुन्या तीनचाकी रिक्षाला रंगरंगोटी करून त्यांनी दुकानासारखी सजावट केली. कोरोनाच्या सावटात असलेल्या ग्राहकांना थेट कॉलनी, बंगल्याजवळ गरजेचे पूजा साहित्य व विविध वस्तू विक्री करून कुटुंबाचा आधार झाले. या छोट्याशा व्हॅनमध्ये अगरबत्ती, कापूर, धूप, लोभान, मंत्र मशिन, फुलवात, फायबर रिफ्लेक्शन दिवा, गुलाबजल, गो धूप, कॉटन पिशवी आदी साहित्य ते विक्रीस ठेवतात. शहरातील सटाणा नाका, मोसम पूल चौक भागात जास्त काळ थांबून दिवसभरात फोनवर ऑर्डर घेऊन ग्राहकांना थेट घरी वस्तू देतात. कलेक्टर पट्टा भागातील देवीदास कोष्टी यांनी आपला रिक्षा व्यवसायातून रोजगार हिरावला गेल्याने अगरबत्ती विक्रीतून गुजराण करीत मोबाईल व्हॅनद्वारे आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न केला

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

मोबाईल व्हॅनवर अगरबत्ती विकत गुजराण 
दरम्यान, गर्दीच्या कारणास्तव मंदिरासह धार्मिक स्थळे बंद असल्याचा या व्यवसायावर परिणाम झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजेच्या वस्तू घरपोच करण्याचा कोष्टी यांचा मनोदय आहे. अगरबत्ती घरीच बनवली जाते. त्यामुळे घरातील गृहिणीचीही मदत होते. घरोघरी विक्रीसह छोट्या-मोठ्या दुकानदारांनाही अगरबत्ती पोचवली जाते. या व्यवसायात कुटुंबातील तीनही मुले हेमंत, जगदीश व महेंद्र कोष्टी यांचे सहकार्य व पाठबळ मिळाल्याचे कोष्टी सांगतात. 

हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

पंचवीस वर्षांपासून रिक्षा व्यवसायात आहे. कधीही अशी भयानक परिस्थिती आली नाही. कोरोनाच्या भीतीपेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. कुटुंबातील मुलांचाही रोजगार गेल्याने या नव्या व्यवसायाची सुरवात केली. - देवीदास कोष्टी  

संपादन - ज्योताी देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona unemployment success stories malegaon nashik marathi news