नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीला मनपाचा हिरवा कंदील; प्रभागात दीड कोटीची विकासकामे

nmc2.jpg
nmc2.jpg

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट होऊन तब्बल ५०० कोटींची महसुली तूट दिसत असल्याने भांडवली कामांवर परिणाम होणार आहे. मात्र असे असले तरी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीला मात्र प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळणार आहे. सहा महिन्यांत प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांवर खर्चासाठी चाळीस लाखांचा निधी मिळणार आहे. लेखा विभागाने पन्नास कोटींचा निधी बाजूला काढला आहे. 

स्वेच्छा निधीला मनपाचा हिरवा कंदील 

यंदाच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे २१६१.७९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तत्कलीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीने विविध योजनांचा समावेश करताना २२८.५५ कोटी रुपयांची वाढ सुचविल्यानंतर २३९०.३४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकामध्ये नगरसेवकांना विकासकामांसाठी भरघोस निधी देताना तीन वर्षांतील निधी टंचाईचा बॅकलॉग भरून काढण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला होता. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये प्रभाग विकासनिधी व नगरसेवक स्वेच्छा निधीसाठी ३९.४४ लाखांची तरतूद केली होती. स्थायी समितीने त्यात वाढ करत आता प्रत्येकी नगरसेवकाला ८५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्याव्यतिरिक्त रस्ते खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी प्रत्येक सदस्याला ४०.९८ लाख रुपये, तर प्रत्येक प्रभागासाठी १.६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. 

आठ वर्षांपेक्षा जुन्या रस्त्यांना चकाकी 

आठ वर्षांपेक्षा जुन्या रस्त्यांच्या विकासासाठी प्रत्येक नगरसेवकांना पन्नास लाखांचा स्वतंत्र निधी पुढील तीन ते चार वर्षांसाठीच्या मोठ्या प्रकल्पांसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या अखर्चित निधीमधून तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही परिस्थिती कोरोनापूर्वीची होती. मार्चमध्ये देशभरात कोरोना प्रादुर्भावाला सुरवात झाल्यानंतर देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मार्चअखेर पालिकेला घरपट्टीतून मोठे उत्पन्न मिळते. परंतु कोरोनामुळे ते मिळाले नाही. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ४५ कोटी रुपयांची घट आली, तर एकूण पाचशे कोटींचा तोटा पालिकेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे भांडवली कामावर त्याचा परिणाम होणार हे स्पष्ट असले तरी नगरसेवकांना मात्र स्वेच्छा निधी देण्यासाठी लेखा विभगाने तरतूद केली असल्याने कोरोना काळातही नगरसेवकांना प्रशासनासोबत भांडण्याची आवश्‍यकता भासणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

नगरसेवकांना मिळणार ४० लाख 

नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या आठवड्यात भांडवली व महसुली कामांचा आढावा घेताना उत्पन्नाची बाजू समजून घेत त्यात पाचशे कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता वर्तविली. तुटीमुळे भांडवली कामांवर परिणाम होणार असला तरी नगरसेवकांना किरकोळ कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवकनिहाय ४० लाख रुपये दिले जाणार असून, त्यासाठी पन्नास कोटींच्या निधीची तरतूद केली. मात्र स्थायी समितीने प्रभागनिहाय सव्वाकोटी व नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीमध्ये केलेली ४५ लाखांची अतिरिक्त वाढ मिळणार नाही. ४ नगरसेवकांच्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात साधारण दीड कोटीहून अधिकची कामे होणार आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com