चिखल, पाणी तुडवत कृषिमंत्र्यांची पिकांच्या नुकसानीची पाहणी; तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

प्रमोद सावंत
Saturday, 26 September 2020

शेतकऱ्यांनी तत्काळ मे. भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर किंवा ईमेलवर कंपनीला इंटिमेशन (सूचना) कराव्यात. शासनाने विकसित केलेल्या मोबाईल क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून पिकाच्या झालेल्या नुकसानीची माहिती फोटोसह अपलोड करावी, असे शेतकऱ्यांसह कृषी व महसूल प्रशासनास सांगितले.

नाशिक : (मालेगाव) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाची शुक्रवारी (ता. २५) चिखल, पाणी तुडवत थेट बांधावर जाऊन कृषिमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली. आठवड्यातील सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वत्र पावसाचे पाणी जमा होऊन झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश श्री. भुसे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. 

मका व ऊस यासह विविध पिकांची पाहणी

श्री. भुसे यांच्यासमवेत उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदींसह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. श्री. भुसे यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाटणे येथील रामदास तांबे यांची भेंडी व डाळिंब, शेखर थोरात (आघार खुर्द) यांचा मका, चिंचावड येथील कारभारी गांगुर्डे यांचा मका व ऊस यासह विविध पिकांची पाहणी केली. सद्यः स्थितीतील नुकसानीसह तालुक्यात ज्या ठिकाणी संततधारेमुळे नुकसान झाले आहे त्या कृषी क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

नुकसानीची माहिती मागविली

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ मे. भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर किंवा ईमेलवर कंपनीला इंटिमेशन (सूचना) कराव्यात. शासनाने विकसित केलेल्या मोबाईल क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून पिकाच्या झालेल्या नुकसानीची माहिती फोटोसह अपलोड करावी, असे शेतकऱ्यांसह कृषी व महसूल प्रशासनास सांगितले. पाहणीवेळी तारकचंद तांबे, संतोष शेवाळे, चंद्रकांत अहिरे, तुकाराम बागूल, दौलत मोरे, स्वप्नील पवार, देवाजी पवार, कोमल वाघ, दगडू ठोके, दत्तू थोरात, वाल्मीक खैरनार, भाऊसाहेब चव्हाण, मन्साराम जाधव, दीपक बोरसे, बाळू सूर्यवंशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.  

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage inspection by Minister of Agriculture nashik marathi news