
नाशिक : कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडत असताना विवाह, समारंभांवरही त्याचा परिणाम झाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यातील विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. अनेकांनी आपले विवाह थेट पुढच्या वर्षापर्यंत ढकलले आहेत. विवाहाशी संबंधित बाजारपेठेला हा मोठा आर्थिक फटका मानला जात आहे. ठराविक नातेवाइकांच्या उपस्थितीत घरातच विवाह सोहळे आटोपण्याचे नियोजनही काही ठिकाणी होत आहे.
अनिश्चित काळासाठी विवाह पुढे ढकलले जाऊ शकते
कोरोनामुळे जागतिक पातळीवर कहर माजला आहे. भारतात काही दिवसांपूर्वी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात होता. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने हा दावा कमी होत गेला. 24 मार्चला देशभरात लॉकडाउन सुरू झाले. त्यापुर्वी राज्यात मुख्यमंत्र्यांनी जमावबंदी त्यानंतर संचारबंदी लागू केली. आता पुन्हा 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. "न भूतो ना भविष्यति' अशा परिस्थितीला नागरिकांना तोंड द्यावे लागणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. परिस्थिती सुरळीत झाली तरी अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी फार मोठा कालावधी लागणार आहे. अर्थव्यवस्थेवर जसा परिणाम दिसून आला त्याप्रमाणे लग्नसमारंभावरही परिणाम झाला आहे. मुळात कलम 144 लागू असल्याने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येत नाही. त्यामुळे मार्चमधील विवाह समारंभ ठराविक नातेवाइकांच्या उपस्थितीत पार पडले. परंतु आता एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणारे लग्न समारंभदेखील पुढे ढकलण्यात आले आहेत.
विवाह पुढे ढकलण्याचे नियोजन
अद्याप अनेकांनी तारखा ठरविल्या नसल्या तरी परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीदरम्यान येणाऱ्या मुहूर्तात अक्षदा टाकून घेण्याचे नियोजन आहे. परंतु अशीच परिस्थिती कायम राहिल्यास अनिश्चित काळासाठी विवाह पुढे ढकलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विवाह ठरविताना वयाचा विचार करणारी बहुतांश मंडळी आहे. त्यांच्याकडून मात्र बडा लवाजमा न करता विवाह आटोपून घेण्याचे नियोजन आहे. शहरात विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेलची संख्या अडीचशेच्या वर आहे. आढावा घेतला असता दीडशे विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयांकडे विचारणा करण्यात आली होती. परंतु लॉकडाउनमुळे विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत, तर लॉन्स मालकांनी या वर्षी कार्यालये मिळणारच नसल्याचे सांगितले.
अर्थव्यवस्थेवर परिणाम
एक लग्न सोहळ्यासाठी किमान पाच लाखांचा खर्च येतो. यात कपडे, सोने, केटरर्स, मंडप, वाजंत्री, लग्नपत्रिका, फटाके आदी खर्चाचा समावेश होतो. शाही सोहळा असेल तर पन्नास लाख ते एक कोटीपर्यंत खर्च होतो. आता विवाह सोहळे पुढे ढकलले जात असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर अर्थात, अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
यंदाच्या हंगामातील विवाह मुहूर्त
एप्रिल 2020- 15, 16, 26, 27.
मे 2020- 2, 5, 6, 8, 12, 14, 17, 18, 19, 24.
जून- 11, 14, 15, 25, 29, 30.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.