चिंचेचे झाड बनले शाळकरी विद्यार्थ्याचा काळ; आजोळीच निघाली अंत्ययात्रा

हंसराज भोये
Thursday, 28 January 2021

आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे पाचवीत शिकणारा नरेश व बहिण आजोळी राहायला आले. सुट्टीमध्ये जवळच असलेल्या चिंचेच्या झाडावर चढण्याचा मोह नरेशला आवरता आला नाही. आणि तो चढला पण त्याच क्षणी जणू त्या झाडावर काळच दडून बसला होता. आणि नरेश आई- वडिलांपासून कायमचा दुरावला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सुरगाणा (जि.नाशिक) : आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे पाचवीत शिकणारा नरेश व बहिण आजोळी राहायला आले. सुट्टीमध्ये जवळच असलेल्या चिंचेच्या झाडावर चढण्याचा मोह नरेशला आवरता आला नाही. आणि तो चढला पण त्याच क्षणी जणू त्या झाडावर काळच दडून बसला होता. आणि नरेश आई- वडिलांपासून कायमचा दुरावला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आजोळीच निघाली अंत्ययात्रा 

वारपाडा (ता. सुरगाणा) येथील घटना असून नरेश रामजी देशमुख (वय ११) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. नरेश गुजरातमधील बर्डा (ता. वघई, जि. डांग) येथील रहिवासी असून, सोनगढ व्यारा येथे राहून जयसिंगपूर येथील आश्रमशाळेत पाचवीत शिकत होता. आई-वडील पिंपळगाव भागात मजुरीसाठी गेल्यामुळे नरेश व त्याची बहीण उमा दहा ते बारा दिवसांपासून वावरपाडा येथे आजोबा बाळू गावित यांच्याकडे राहायला आले होते. सोमवारी (ता. २५) सायंकाळी नरेश गावालगतच्या चिंचेच्या झाडावर चढला. या झाडामधून उच्चदाब विद्युत तारा गेल्या आहेत. गावात नवीन असल्याने त्याला याबाबत माहिती नसावी. त्यामुळे त्याच्या पायाचा तारेला स्पर्श होताच विजेचा जोरदार धक्का बसून, त्याचा झाडावरच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी तलाव, विहिरी आदी ठिकाणी शोध सुरू केला.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

कुणीतरी झाडावर चढून बसले पण हालचाल होत नव्हती

मंगळवारी (ता.२६) सकाळी भास्कर सूर्यवंशी शेतात गेले असता अचानक त्यांचे लक्ष चिंचेच्या झाडाकडे गेले. त्या वेळी कुणीतरी झाडावर चढून बसले असून, हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे जवळ जाऊन पाहिले असता हा प्रकार लक्षात आला. पोलिसपाटील पांडुरंग वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोडके, एम. के. पवार, गायकवाड यांनी पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

विजेचा धक्का बसल्याने मृत्यू

वारपाडा (ता. सुरगाणा) येथे उच्च दाबाच्या विजेचा धक्का बसल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा चिंचेच्या झाडावरच मृत्यू झाला. नरेश रामजी देशमुख (वय ११) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of schoolboy due to electric shock nashik marathi news