esakal |  तीन वर्षांच्या तुलनेत मालेगावात दफन-कफनची संख्या वाढली; आकडेवारीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

 death toll in Malegaon has increased in three years Nashik Marathi News

शहरातील पश्‍चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच ऑक्सिजन व बेडची कमतरता, रेमडेसिव्हिरसाठीची भटकंती यामुळे सारा कसमादे हवालदिल झाला आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत असताना पूर्व भागातील बेफिकिर वृत्ती कायम आहे.

 तीन वर्षांच्या तुलनेत मालेगावात दफन-कफनची संख्या वाढली; आकडेवारीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पश्‍चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच ऑक्सिजन व बेडची कमतरता, रेमडेसिव्हिरसाठीची भटकंती यामुळे सारा कसमादे हवालदिल झाला आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत असताना पूर्व भागातील बेफिकिर वृत्ती कायम आहे. वृत्तीमागे तीन वर्षांतील कब्रस्तानातील मार्चमधील मृत्यूच्या आकडेवारीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. तीन वर्षांच्या तुलनेत मार्चमधील दफन-कफनची संख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी ‘लौट आयेगी खुशियाँ, अभी कुछ गमों का शोर है, जरा संभलकर रहो दोस्तो, ये इम्तिहान का दौर हैं’, असे मानल्यास कोरोना संसर्गाला आळा घालणे सोयीचे होईल. 

शहरातील सहारा रुग्णालयात सात व सामान्य रुग्णालयात तीन, याप्रमाणे ९ एप्रिलला या दोन रुग्णालयांतच दहा जणांचा बळी गेला. त्याशिवाय ग्रामीण भागातील मृतांची संख्या वेगळी आहे. विशेष म्हणजे बळी गेलेल्यांमध्ये सर्वच वयोगटांतील कोरोनाबाधितांचा समावेश आहे. तरुणांपाठोपाठ लहान मुलेही संसर्गाच्या कवेत आल्याने चिंता वाढली आहे. महापालिका क्षेत्रात सध्या दोन हजार ६० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील ४२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित एक हजार ६३५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. आजवर २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी घसरली आहे. हे प्रमाण ७६.२९ टक्के झाले आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.५० टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची प्रत्यक्ष संख्या कमी दिसत असली तरी पूर्व भागात कोरोना चाचणीच केली जात नाही. ५० टक्के नागरिकांची कोरोना नाही, अशी भूमिका आहे. मास्क लावण्याचे प्रमाणही अवघे २० टक्के आहे. पूर्व भागात लसीकरणाला मिळणारा नकारही चिंताजनक आहे. मृतांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

चार वर्षांतील मार्चमधील तुलनात्मक आकडेवारी 
कब्रस्तानचे नाव - २०१८ २०१९ २०२० २०२१ (मार्च) 
बडा कब्रस्तान - १२५ १७२ १७५ २५३ 
आयेशानगर कब्रस्तान - ५१ ५० ४९ १०२ 

याशिवाय शहरातील कॅम्प भागातील मोहंमदिया, सोनापुरा, संगमेश्‍वरातील मोतीबाग नाका, पूर्व भागातील बोहरा कब्रस्तान, शिया कब्रस्तान व आझादनगरातील छोटा कब्रस्तान येथील सहा कब्रस्तानात दहापेक्षा अधिक मृत्यूची नोंद आहे. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा