जिल्ह्यातील ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत घट; बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक 

अरुण मलाणी
Tuesday, 6 October 2020

जिल्ह्यात पुन्‍हा एकदा नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या एक हजारहून कमी राहाण्यासोबतच, बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची दिवसभरातील संख्या अधिक राहिली. दिवसभरात ९०७ बाधित आढळले, तर एक हजार १०१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : जिल्ह्यात पुन्‍हा एकदा नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या एक हजारहून कमी राहाण्यासोबतच, बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची दिवसभरातील संख्या अधिक राहिली. दिवसभरात ९०७ बाधित आढळले, तर एक हजार १०१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात चौदा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २०८ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत नऊ हजार ३०० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची दिवसभरातील संख्या अधिक
सोमवारी (ता. ५) आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ६७४, नाशिक ग्रामीणचे २१०, मालेगावचे २०, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्‍ण आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील ६७६, नाशिक ग्रामीणचे ४१५, मालेगावचे तीन, तर जिल्‍हाबाह्य सात रुग्‍णांचा समावेश आहे. चौदा मृत्‍यूंपैकी बारा नाशिक शहरातील असून, नाशिक ग्रामीणच्‍या दोघा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार २३ वर पोचली आहे. यापैकी ७० हजार २७२ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एक हजार ४५१ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

९८२ अहवाल नाशिक ग्रामीणचे
दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २७६, नाशिक ग्रामीणचे ११६, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १७ आणि जिल्‍हा रुग्‍णालयात आठ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४३० संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ९८२ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ
मालेगावमध्ये ३० कोरोनाबाधित 
मालेगाव : महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या येथील दोन व मनमाड येथील एका रुग्णाचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. शहरातील कोरोनाबळींची संख्या १५९ झाली आहे. नव्याने ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील २० रुग्ण शहरातील, तर अन्य दहा ग्रामीण भागातील आहेत. महापालिकेने तपासणी नमुन्यांची संख्या वाढविली आहे. शहरातील २४२ अहवाल प्रलंबित आहेत. महापालिकेच्या विविध रुग्णालयात आज नव्याने १५ रुग्ण दाखल झाले.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in the number of active patients in nashik district marathi news