चर्चा फक्त एकनाथ खडसेंच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशाचीच! 

संपत देवगिरे
Friday, 23 October 2020

भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी (ता. २३) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक खडसे समर्थकांचे फोन गुरुवारी स्विचऑफ झाले होते.

नाशिक : भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी (ता. २३) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक खडसे समर्थकांचे फोन गुरुवारी स्विचऑफ झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अपेक्षित मात्र सर्वांत मोठी राजकीय उलथापालथ मानली जाते. त्यामुळे गुरुवारी विविध आघाड्यांवर केवळ एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रवेशाचीच चर्चा होती. 

भाजपने मांडलेला सारीपाट उधळला.

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याशिवाय वेगळे काही घडेल, अशी कल्पना जरी मांडली तरी ती लगेच खोडली जाईल, अशी स्थिती गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी होती. त्यात श्री. खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. तरीही फडणविसांच्या गुड बुकमध्ये त्यांना स्थान नव्हते. त्यातही जळगावसह सबंध राज्यात फडणवीसांचे राजकीय संकटमोचक म्हणून पक्षात दबदबा निर्माण केला. गिरीश महाजन यांनी खडसे व भाजपमधील खडसे समर्थकांना साधी कोपऱ्यात टाकण्याची आवडती मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे खडसे अक्षरशः विजनवासात होते. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय मांडणीतून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. भाजपने मांडलेला सारीपाट उधळला. भाजपला त्याचा पहिला राजकीय शॉक खडसे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रवेशाने बसणार आहे. त्यामुळे कालपर्यंत चर्चेतही नव्हती, अशा अंजली दमानिया यांच्यापासून तर अनेक मंडळी पुन्हा प्रकट झाली आहेत. या घडामोडींत गुरुवारी दिवसभर नाशिक, जळगाव, मुंबई सगळीकडेच माध्यमे व राजकीय वर्तुळात चर्चा फक्त एकच होती, ती खडसे यांच्या प्रवेशाची. 
खडसे यांचा प्रवेश अचानक झालेला नाही.

खडसे यांच्यासमवेत कोण जाणार हे स्पष्ट होणार

त्याची गेले सात-आठ महिने चर्चा सुरू होती. त्यामुळे प्रवेशानंतर श्री. खडसे यांचे पुनर्वसन, राजकीय भूमिका, डावपेच सगळे निश्‍चित असतील. फक्त ते हळूहळू स्पष्ट होत जातील. यात जेवढे धक्के बसतील, वजाबाकी होईल ती भाजपची. कारण त्यांनी एक मोठा नेता गमावला, महाविकास आघाडीने कमावला. शुक्रवारी प्रवेश झाल्यावर खडसे यांच्यासमवेत कोण जाते हे स्पष्ट होईल. भविष्यात कोण जातील याचा अंदाज बांधला जाईल. एकंदरच उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या राजकारणावर थेट परिणाम होऊन राजकीय गणिते बदलू शकतील. रोहिणी खडसे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा आहेत. त्यादेखील नव्या पक्षात प्रवेश करतील. पुढे-मागे स्नुषा खासदार रक्षा खडसे यांची दिशा काय असेल, हे स्पष्टच आहे. त्यामुळे बॅंकेसह विविध संस्था खडसे यांच्या ताब्यात आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत खडसे यांचा अप्रत्यक्ष संपर्क आहे. त्याला आता राज्यातील सत्तेची साथ मिळेल. त्यामुळे आज नसला तरी आगामी निवडणुकांसाठी सुरुंगपेरणी होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळेच गुरुवारी दिवसभर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सगळीकडे चर्चा फक्त खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रवेशाचीच होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion is only about Eknath Khadse's NCP entry nashik marathi news