''महाग औषधे-इंजेक्शन गरिबांसाठी देण्यास संस्थांशी बोलणे सुरू''

Sharad_Govindrao_Pawar.jpg
Sharad_Govindrao_Pawar.jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग वाढल्याने आरोग्याच्या प्रश्‍नांच्या जोडीला आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत नाशिकसह औरंगाबाद, नागपूर, पुणे या औद्योगिक टापूतील उद्योग पूर्ण क्षमतेने चालवत अर्थव्यवस्था उभी करावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २४) येथे सांगितले. कोरोनाच्या भीतीने निघून गेलेले कामगार परत येण्यास उत्सुक असल्याने त्यांची व्यवस्था करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे ५० इंजेक्शन दिली आहेत 

जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव, त्यावरील उपाययोजना आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी या वेळी उपस्थित होते. महाग औषधे आणि इंजेक्शन गरिबांसाठी उपलब्ध व्हावीत, म्हणून संस्थांशी बोलणे सुरू आहे. गरिबांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ५० इंजेक्शन दिली आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावरील उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. 

 नाशिकमध्ये डॉक्टर पुढे न येणे वाईट 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असलेल्या नाशिकमध्ये उपाय योजनांच्या स्तरावर डॉक्टर पुढे येत नाहीत. हे चांगले लक्षण नाही. यापुढील काळात कोरोनाचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज येऊ नये, असे सांगून श्री. पवार यांनी नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये खाटांची संख्या वाढविण्याची गरज असून, त्यासंबंधीची तयारी दर्शविण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुळातच, संकटाची समस्या वाढेल असे कुणीही काहीही करू नये, असेही त्यांनी म्हटले. श्री. भुजबळ यांनी बैठकीमागील उद्देश नमूद केले. 

लॉकडाउनचा थमरुल अन्‌ निर्णय अधिकार 

कोरोनाची साखळी तोडणे, खाटा, डॉक्टर अशा आरोग्य सुविधांची वाढ करणे यासाठी लॉकडाउन हा थमरुल आहे. त्यातूनही स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांना दिलेत, असे सांगून श्री. टोपे म्हणाले, की १५ ते २१ ऑगस्टपर्यंत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा खाटा नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. नाशिकमधील रुग्णसंख्या वाढत असली, तरीही कोरोनामुक्तचे प्रमाण ७१ टक्के आहे. नाशिकमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री आणखी २७७ खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करताहेत. शिवाय तीन कंपन्यांना औषध-इंजेक्शनसंबंधीच्या ऑर्डर दिल्या आहेत. दरसूची ठरली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त कंपन्यांकडून थेट औषधांची मागणी करू शकतील. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुबलक औषधे उपलब्ध होतील. 

खासगी रुग्णालयाचे बिल तपासूनच 

श्री. टोपे म्हणाले, की नाशिकमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कॉल सेंटर सुरू करतील. आरोग्यसेवेत आयएमएच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांना सामावून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा घेताना त्यावर दोन अधिकाऱ्यांची देखरेख राहील. एकाकडे खाटांचे व्यवस्थापन दिले जाईल. तसेच लेखापरीक्षक पॅकेजअंतर्गतची सेवा आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गतचे ९७७ उपचार याची तपासणी लेखापरीक्षक करतील. त्यांच्या तपासणीनंतर मगच खासगी रुग्णालयाचे बिल रुग्णांना दिले जाईल. मुख्यमंत्र्यांची मान्यतेनंतर दोन आठवड्यांत आरोग्यची रिक्त पदे भरणार. तीन हजार कम्युनिटी हेल्थ ऑफिसरांचे प्रशिक्षण पुढे ढकलून त्यांना राज्याच्या आरोग्यसेवेत दाखल करून घेतले जाईल. 

मालेगावमध्ये प्लाझ्मा थेरपी सेंटर 

मालेगावमध्ये प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू केले जाईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले. याशिवाय लॅबमधून कोरोनाविषयक रिपोर्ट पॉझिटिव्ह-निगेटिव्ह येऊ शकतात, असे सांगून त्यांनी सेन्सिटिव्हिटीचा तांत्रिक मुद्दा मांडला. श्री. पवार म्हणाले, की जनतेचे देणे लागतो ही बाब डोळ्यापुढे ठेवून राजकारण करण्याची गरज नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घालावे. शिवाय केंद्राच्या काही योजना आल्या आहेत, पण २० हजार कोटी असे आकडे मी ऐकतो आहे, माझ्या ज्ञानात भर काही पडलेली नाही. 

(संपादन - किशोरी वाघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com