''राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 27 लाख 81 हजार 497 क्विंटल अन्नधान्याचे वाटप''

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

राज्यात अडकलेल्या दोन लाख ६६ हजार ३१९ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत, त्या ठिकाणी पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला महिन्याला पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

नाशिक : राज्यातील ५२ हजार ४३७ रेशन दुकानांमधून १ ते २१ जुलैपर्यंत एक कोटी १८ लाख ९८ हजार ९१३ शिधापत्रिकाधारकांना २७ लाख ८१ हजार ४९७ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात जुलैमधील आतापर्यंत २० लाख ४३ हजार ८६२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले. 

पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे. राज्यात योजनेमधून सुमारे १४ लाख ९४ हजार २५५ क्विंटल गहू, ११ लाख ४७ हजार २९२ क्विंटल तांदूळ, तर १५ हजार ६९९ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या दोन लाख ६६ हजार ३१९ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत, त्या ठिकाणी पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला महिन्याला पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

महिन्याला पाच किलो तांदूळ मोफत

१५ जुलैपासून आतापर्यंत जुलैसाठी सहा लाख ३४ हजार ९६१ रेशनकार्डला मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले. या रेशनकार्डवरील २७ लाख ९९ हजार १८ लोकसंख्येला एक लाख ३९ हजार ९५१ क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला महिन्याला पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ६ जूनपासून आतापर्यंत जूनसाठी एकूण एक कोटी ४० लाख ३१ हजार २९० रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. 

दीडलाख क्विंटल तांदळाचे मोफत वाटप 

राज्य सरकारने कोरोना संकटावरील उपाययोजनेसाठी तीन कोटी आठ लाख ४४ हजार ७६ एपीएल केसरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू आठ रुपये व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो) देण्याचा निर्णय घेतला. या धान्याचे मे व जूनसाठी आतापर्यंत १३ लाख चार हजार ४६ क्विंटल वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत रेशनकार्ड एक किलो मोफत डाळ (तूर अथवा हरभराडाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत योजनेतून सुमारे तीन लाख ७७ हजार १५८ क्विंटल डाळीचे एप्रिल ते जूनसाठी वाटप केले आहे.

हेही बघा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ

आत्मनिर्भर भारत योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या दोन महिन्यांसाठी असून, त्याअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ दिला जात आहे. आतापर्यंत एक लाख ३२ हजार ५८२ क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे. 

हेही बघा > धक्कदायक! पिडितेचा शोधला वैयक्तिक क्रमांक.. व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपवर पाठविले नग्न छायाचित्र...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of 27 lakh 81 thousand 497 quintals of foodgrains in the state till July - Chhagan Bhujbal nashik marathi news