डीजे अत्याचार प्रकरण.. गुन्हा दडपविण्यासाठी पोलिसांवर लोकप्रतिनिधींनीचा दबाव?

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुख्य संशयित संदेश काजळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, तसेच हा गुन्हा दडपविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. घटनास्थळी संशयित काजळेने गोळीबार केल्यामुळे गुन्ह्यात आर्म ऍक्‍ट लावण्यात आला नाही.

नाशिक : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवर डीजेवादक दोघा युवकांना मारहाण करीत अत्याचार केल्याप्रकरणी तपासातून घटनास्थळी गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, गुन्ह्यात आर्म ऍक्‍टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे सुरू असून, पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचे नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (ता. 14) स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणी नाशिक अन्याय निवारण संघर्ष समितीतर्फे पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. 

फार्महाउसवर संशयितांकडून गोळीबार 

दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवर मुख्य संशयित संदेश काजळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये डीजे वाजविण्यासाठी गेलेल्या फुलेनगरमधील विनय पगारे, निखिल पवार या दोघांना मध्यरात्री मारहाण करून त्यांच्यावर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी वाच्यता झाल्यानंतरही एक दिवसाने नाशिक तालुका पोलिसांत ठार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात सर्वपक्षीय मोर्चा शनिवारी (ता. 18) गोल्फ क्‍लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. यासाठी नाशिक अन्याय निवारण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. 14) नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

गुन्ह्याची नोंद; दबाव नसल्याची पोलिस अधीक्षकांची माहिती 

निवेदनानुसार गुन्ह्यातील मुख्य संशयित संदेश काजळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, तसेच हा गुन्हा दडपविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. घटनास्थळी संशयित काजळेने गोळीबार केल्यामुळे गुन्ह्यात आर्म ऍक्‍ट लावण्यात आला नाही. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमाकांत पाटील नामक पोलिस अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा, पीडित युवकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना संरक्षण देण्यात यावे, संबंधित पीडित कुटुंबीय मोलमजुरी करणारे असल्याने समाजकल्याण विभागाकडे शिफारस करून आर्थिक मदतीसाठी पोलिस प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा > जावई आला दारू पिऊन घरी...अन् सासूसोबत केला धक्कादायक प्रकार.. 

निवेदनावर समितीचे माजी पोलिस अधिकारी डॉ. संजय अपरांती, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, किरण मोहिते, कविता कर्डक, ऍड. तानाजी जायभावे, दीपक डोके, अरुण काळे, राजू देसले, संतोष सोनपसारे, सुरेश मारू, बिपिन कटारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

हेही वाचा >  स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DJ operator torture case follow up Nashik Crime Marathi News