Corona Updates : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीचा डबलिंग रेट ३१ दिवसांचा

अरुण मलाणी
Monday, 5 October 2020

गेल्‍या ३ सप्‍टेंबरला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजारांवर पोचली होती. मात्र, सप्‍टेंबरच्या उत्तरार्धात बाधितांची संख्या घटली. तीन ते चार दिवस रुग्‍णसंख्या एक हजाराहून कमी राहिली. याचा परिणाम म्‍हणून डबलिंग रेटच्या कालावधीत वाढ झाली.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८० हजार पार पोचली आहे. रविवारी (ता. ४) नव्‍याने आढळलेल्‍या ८३६ बाधितांमुळे ही संख्या ८० हजार ११६ झाली. यापैकी ६९ हजार १७१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. पहिल्‍या टप्प्‍यात जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना रुग्‍णसंख्या दुप्पट होण्याचा वेग अर्थात, डबलिंग रेट १६ ते १८ दिवसांचा होता. नंतर हा २५ ते २८ दिवसांवर गेला होता, तर चाळीस हजारांहून ऐंशी हजार बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (डबलिंग रेट) ३१ दिवसांचा राहिला.

एकूण बाधितांची संख्या ८० हजार पार; ६९ हजार रुग्‍ण कोरोनामुक्‍त 

गेल्‍या ३ सप्‍टेंबरला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजारांवर पोचली होती. मात्र, सप्‍टेंबरच्या उत्तरार्धात बाधितांची संख्या घटली. तीन ते चार दिवस रुग्‍णसंख्या एक हजाराहून कमी राहिली. याचा परिणाम म्‍हणून डबलिंग रेटच्या कालावधीत वाढ झाली. दरम्‍यान, रविवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ३९७, नाशिक ग्रामीणचे ४२७, मालेगावचे तीन, तर जिल्‍हाबाह्य नऊ बाधितांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये ४७९ रुग्‍ण नाशिक शहरातील, २६७ नाशिक ग्रामीणचे, एक मालेगावचा, तर जिल्‍हाबाह्य पंधरा रुग्ण आहेत. दहा रुग्‍णांचा दिवसभरात मृत्‍यू झाला असून, यापैकी पाच नाशिक शहरातील, नाशिक ग्रामीणचे चार, तर मालेगाव महापालिका हद्दीतील एक रुग्ण आहे. यातून एकूण मृतांची संख्या एक हजार ४३७ वर पोचली आहे. 

जिल्‍हा रुग्‍णालयात पंधरा संशयित दाखल
दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २६६, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ११६, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २१, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ, जिल्‍हा रुग्‍णालयात पंधरा संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

रुग्‍णवाढीचे महत्त्वाचे टप्पे व दिनांक 
४ जुलै------------------५ हजार 
२१ जुलै----------------१० हजार 
१० ऑगस्‍ट-------------२० हजार 
३ सप्‍टेंबर--------------४० हजार 
४ ऑक्‍टोबर------------८० हजार 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

मालेगावला दोघांचा मृत्यू 
मालेगाव : शहर व तालुक्यात रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. कॅम्प भागातील तोटे गल्लीतील ५० वर्षीय व रावळगाव येथील ६५ वर्षीय रुग्णाचा सहारा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महापालिका हद्दीत तीन रुग्ण आढळले. शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४११, तर तालुक्यात ३५७ आहे. अद्याप २५३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubling rate of patient Nashik district is thirty one days marathi news