आडमार्गाने चाललीय घुसखोरी.."इनकमिंग'वाल्यांचा नाशिककरांना धक्का!

lockdown 3.jpg
lockdown 3.jpg

नाशिक : मालेगावमधून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना 29 एप्रिलला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणांना केली होती. पण त्याबद्दलची गंभीर दखल घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत नसल्याने "इनकमिंग'वाल्यांमुळे नाशिककरांना धडकी भरलीय. नाशिक शहरामध्ये 86 आणि महामार्ग व नऊ आंतरराज्य सीमा अशा 27 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तरीपण आडमार्गाने चाललेली घुसखोरी थांबलीय काय, याचा शोध घ्यावा लागणार आहे. 

रोज 40 टक्के मुंबईकर अन्‌ 60 टक्के मालेगावकरांसह एखादं दुसऱ्या पुणेकराची तपासणी 
मुंबई-आग्रा महामार्गावर दहाव्या मैलाच्या अलीकडे लोखंडी जाळ्या उभारून नाकाबंदी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते खरे, मात्र या ठिकाणी कुणीही कोण कुठे चालले आहे, याची खातरजमा करताना दिसत नाही. नाशिकच्या सगळ्या सीमा सील केल्या, अगदी गणवेशधारी पोलिस अधिकाऱ्यांना इगतपुरीमध्ये परत जायला सांगण्यात आले, असा दावा ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. मग प्रश्‍न पडतो तो म्हणजे, नाशिक महापालिकेच्या डॉक्‍टर आणि परिचारिकांना जाणाऱ्या "कॉल'च्या आधारे रोज 40 टक्के मुंबईकर आणि 60 टक्के मालेगाववाल्यांच्या होणाऱ्या तपासणीचे काय? हे कमी काय म्हणून रोजच्या "कॉल'मध्ये एखाददुसऱ्या पुणेकराचीदेखील तपासणी करावी लागते. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निगराणी विभागाचे डॉक्‍टरांनी, सहा नोडल अधिकारी आणि डॉक्‍टर-परिचारिका-आशा कर्मचारी अशांची 30 पथके तैनात असल्याची माहिती दिली. दूरध्वनीवरून मिळणारी माहिती "टास्क फोर्स'च्या ग्रुपवर पाठविली जाते, अथवा संबंधित भागातील पथकाला माहिती देण्यात येते. त्यानुसार पथक जाते. नव्याने आलेल्याची सविस्तर माहिती घेतली जाते. बाधित क्षेत्रातून आला आहे काय, कंटेन्मेंट झोन अथवा पॉझिटिव्ह रुग्णाचा संपर्क झाला आहे काय, ही माहिती घेतल्यावर लक्षणे आढळताच, रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले जाते. लक्षणे नसल्यास आणि इतर संदर्भ नसल्यास "होम क्वारंटाइन' करून त्याच्यावर दोन दिवस लक्ष ठेवण्यात येते. अशा पद्धतीने महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे "इनकमिंग'वाल्यांच्या शुश्रूषेची व्यवस्था करण्यात आली आहे. 


शहर सुरक्षित ठेवावे लागेल 
"इनकमिंग'वाल्यांचा विषय जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीपुरता सीमित राहिला नाही. उत्तर प्रदेशातील कष्टकरी रेल्वेने निघाले असताना त्यांना "सेंड ऑफ' देण्यासाठी पालकमंत्री रेल्वेस्थानकात गेले होते. त्या वेळी शेतातूनसुद्धा एकही माणूस येणार नाही एवढे "टाइट' करणार आहोत, अशी माहिती नाशिकचे पोलिस अधिकारी देत होते. मग त्यावर नाशिक शहर सुरक्षित ठेवावे लागेल, हा मुद्दा पुढे येत असताना मालेगावमधून लोक बाहेर पडणार नाहीत, हे पाहायला लागेल, अशी सूचना चर्चेत आली. खरे म्हणजे, श्री. भुजबळ यांनी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी मालेगावमधील काहींनी शेजारील गावात संचार केल्याने संसर्ग झाल्याचे दिसून येत असल्याचा मुद्दा उपस्थित करून चर्चेला तोंड फोडले होते. मात्र, प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नसल्याची बाब यामुळे उघड झाली आहे. 


महापौरांपाठोपाठ आमदारांचा आग्रह 
महापौर सतीश कुलकर्णी यांनी गृहमंत्र्यांकडे नाशिकच्या सीमांवर सीआरपीएफ तैनात करावेत, अशी मागणी केली होती. आता आमदार ऍड. राहुल ढिकले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालेगावमधून विनापरवानगी एकाही व्यक्तीला शहराबाहेर जाऊ देऊ नये आणि मालेगावच्या बाहेरील सीमा सील कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच मालेगावमधील डॉक्‍टर, परिचारिका आणि पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना सेवा-सुविधा पुरवाव्यात, अशी विनंती श्री. ढिकले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. 


प्रमाणपत्राच्या आधारेच प्रवेश 
कोरोनाबाधित अथवा प्रतिबंधित क्षेत्रातून जर कोणास नाशिक जिल्ह्यात यायचे असेल, तर त्याने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घेताना आरोग्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणपत्राच्या आधारे त्या व्यक्तीस नाशिक जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com