मालेगावात यंत्रमागाची खडखड थांबणार? मंदीतच काम बंद झाल्यास बिकट परिस्थिती

spinning
spinning

मालेगावात सायजिंग बंदमुळे यंत्रमागाची खडखड थांबणार 

नाशिक / मालेगाव : राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ व शासनाने कोरोना संसर्ग व स्थानिक परिस्थिती पाहता या संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास आगामी आठवड्यापासून सायजिंग व यंत्रमाग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पॉवर लूम ऍक्‍शन कमिटी व सायजिंग ओनर असोसिएशनचे अध्यक्ष युसूफ इलियास यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

सायजिंगवर यंत्रमाग अवलंबून

शहरातील कोरोना संसर्ग आटोक्‍यात येण्यास यंत्रमाग व्यवसाय सुरू होण्याचा मोठा हातभार लागला आहे. येथील 28 सायजिंग प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या आदेशाने सील केल्या असून, 64 सायजिंगला कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सायजिंगवर यंत्रमाग अवलंबून असल्याने हा निर्णय येथील यंत्रमाग व्यवसायाचा गळा घोटणारा ठरू शकतो.

नाराजी व्यक्त

महामंडळाने 1960 पासून सायजिंग सुरू असताना कधीही अटी-शर्तींसंदर्भात मार्गदर्शन केले नाही. 2020 मध्ये थेट कारवाईच्या नोटिसा बजावल्याने सायजिंगधारक संकटात सापडले. शहरात संमिश्र झोन असल्याने अनेक वर्षे सायजिंग येथेच आहेत. महामंडळाने प्लॅस्टिक कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या सायजिंगवर कारवाई करण्याऐवजी सरसकट सर्व सायजिंगधारकांना दोषी ठरवत नोटीस बजावल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 
शहरात एकूण 130 सायजिंग आहेत. यातील 28 सील आहेत. 64 ला कारणे दाखला नोटिसा बजावल्या आहेत. 

130 पैकी 92 सायजिंग बंद
उर्वरित 38 सायजिंग सुरू राहू शकतात. यंत्रमाग व सायजिंग परस्परपूरक आहेत. एका सायजिंगच्या माध्यमातून सुमारे दोन हजार यंत्रमागांना बीम पुरविला जातो. 130 पैकी 92 सायजिंग बंद आहेत. उर्वरित सायजिंग यंत्रमागाला माल पुरवू शकणार नाहीत. यामुळे साहजिकच यंत्रमाग व्यवसायही आठवड्यात दम तोडेल. 

मंदीतच काम बंद झाल्यास बिकट परिस्थिती
लॉकडाउननंतर मोठ्या परिश्रमानंतर सायजिंग व यंत्रमाग मालक, कामगार, सूतपुरवठा ठेकेदार व कामगारांनी समन्वयाने यंत्रमाग सुरू केले. यासाठी महसूल, महापालिका, पोलिस व शासनानेही परिश्रम घेतले. आता प्रदूषणाच्या मुद्द्यावर मंदीतच काम बंद झाल्यास बिकट परिस्थिती ओढवेल. मुळातच सध्या यंत्रमाग ना नफा-ना तोटा या तत्त्वावर सुरू आहेत. सायजिंगचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास बिकट स्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सायजिंग ओनर असोसिएशनने दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर मंगळवारी (ता. 23) उच्च न्यायालयात सुनावणी आहे. 

अटी-शर्तींची पूर्तता करण्यास तयार

सायजिंग मालक नफ्यासाठी लाकडाऐवजी बॉयलरमध्ये प्लॅस्टिक कचरा जाळतात. त्यातून प्रदूषण होते. याविरोधात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता. काही सायजिंग शहरातील निवासी वस्तीत आहेत, असा आक्षेप घेतला होता. त्याला अनुसरून महामंडळाने कारवाई केली. तथापि, सायजिंग मालक सर्व अटी-शर्तींची पूर्तता करण्यास तयार आहेत. महामंडळ, महापालिका, महसूल, महावितरण या सर्व यंत्रणांनी समन्वयातून यावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे. तातडीने औद्योगिक वसाहतीत अथवा शहराबाहेर सायजिंग स्थलांतर शक्‍य नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. - युसूफ इलियास, अध्यक्ष, सायजिंग ओनर असोसिएशन, मालेगाव 

सील केलेल्या सायजिंग 28 
कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या सायजिंग 64 
काम सुरू असलेल्या सायजिंग 38

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com