फ्लॅट खरेदीत ज्येष्ठाची ११ लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

house fraud.jpg
house fraud.jpg

नाशिक : (इंदिरानगर) ज्येष्ठ नागरिकाने बुक केलेला फ्लॅट त्यांना न देता परस्पर संपूर्ण इमारत दुसऱ्याला विकून अकरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित परेश धोंडोपंत पाटील (मूळ गाव चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

भानुदास महाजन (वय ६६, रा. ग्रीव्हज कॉलनी, सिडको, औरंगाबाद) ग्रीव्हज कंपनीतून निवृत्त झाल्यावर कुटुंबासोबत तेथे राहतात. त्यांची विवाहित कन्या नाशिकमधील इंदिरानगर येथे राहते. २०१२ ला त्यांचे जावई पाराशर महाजन यांनी परेश यांच्याशी ओळख करून दिली. काही महिन्यानंतर पाटील पिंपळगाव बहुला सर्वे क्रमांक १९५ अ, प्लॉट नंबर ८८ येथे श्री संकल्प हा गृहप्रकल्प बांधत असून, त्या ठिकाणी सदनिका घ्यायची असेल तर घेऊन टाका, असा सल्ला सासऱ्यांना दिला. त्याप्रमाणे या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील ६३० चौरसफूट क्षेत्रफळ असलेली सदनिका क्रमांक ७ पसंत पडल्याने १३ लाख ८६ हजारांना घेण्याचे ठरले. त्यासाठी ९ सप्टेंबर २०१३ ला रोख १ लाख रुपये आणि १५ सप्टेंबर २०१३ ला रोख १० लाख रुपये मुलगी आणि जावयाच्या समक्ष पाटील यांना दिले. १२ सप्टेंबर २०१४ ला याबाबतची नोटरी करून देत एका वर्षात या फ्लॅटचा ताबा देण्यात येईल असे सांगण्यात आले. 

संपूर्ण इमारतीचीच केली विक्री

सुमारे दीड वर्ष श्री. महाजन यांनी वाट बघितली. मात्र प्रत्येक वेळी ताबा लवकरच देतो असे सांगण्यात आले. काही दिवसांनी फ्लॅट देणे शक्य नाही, मात्र तुमचे पैसे परत देतो असे वायदे पाटील करू लागले. २०१८ पर्यंत या पद्धतीने आश्वासने दिल्यानंतर महाजन नियोजित साइटवर गेले असता त्यांना ही साइट डॉक्टर हाउस येथील संजय अहिरे यांना पाटील यांनी विकल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी अहिरे यांची भेट घेतली असता त्यांनीही पाटील यांनी ही इमारत मला विकली आहे असे सांगितले.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

महाजन यांनी पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल क्रमांक बंद आढळला. त्यांच्या मूळ गावी चौकशी केली असता त्यांच्या आई-वडिलांनी ते कुठे आहेत माहीत नसल्याचे सांगितले. या प्रकरणात फसवणूक झाल्याची भावना झाल्याने महाजन यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com