पिंपळगावच्या सात संस्थांचा ७ महिन्यांत धुरळा! निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार शह-काटशहाचे राजकारण

elections
elections

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक)  : निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत रणसंग्रामाचे कवित्व संपते न्‌ संपते तोच ३१ मार्चनंतर पिंपळगाव शहरातील राजकीयदृष्‍ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या सात संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सदैव चर्चेत असलेल्या पिंपळगाव शहरात पुढील सहा महिने निवडणुकीच्या निमित्ताने शह-काटशहाचे राजकारण रंगणार आहे.

आर्थिक, सहकारी व शैक्षणिक निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय डावपेच तर बघायला मिळतीलच; शिवाय प्रत्येक निवडणुकीत मोरे, बनकर, खोडे, विधाते या राजकीय घराण्याची वेगवेगळी समिकरणे अस्तित्वात येतील. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दिलीप बनकर व अनिल कदम या आजी-माजी आमदारांमध्ये विधानसभेचा ‘पार्ट-टू’कडे संघर्ष जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे. राजकारणाच्या पंढरीत सात संस्थांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. 

बाजार समितीत रंगणार बनकर-कदम संघर्ष 

आशिया खंडात कांदा, टोमॅटोची राजधानी अशी ख्याती असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत यंदा रंणसंग्राम रंगण्याची चिन्हे आहेत. जून २०२० मध्येच बाजार समितीची मुदत संपली. पण कोविडमुळे आता मार्च-२०२१ नंतर निवडणूक होईल. निफाडच्या राजकीय पटलावर विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या गेल्यावेळी बाजार समिती निवडणुकीत समझोता एक्स्प्रेस धावली अन्‌ बिनविरोधचा चमत्कार घडला. १७ पैकी १३ जागा बनकर यांना, तर चार जागा कदम गटाला, अशी राजकीय मांडवली झाली. यात दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्या प्रमाणात दुखावले गेले होते. हा अनुभव लक्षात घेता यंदा संघर्ष अटळ आहे. कारण आमदार बनकर यांनी दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांचा जिव्हारी लागणारा पराभव केला. ते उट्टे काढण्यासाठी कदम यांनी रणशिंग फुंकले आहे. पिंपळगाव बाजार समितीची सत्ता ही ‘राजकीय लाइफलाइन’ असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. २०० कोटी स्थावर, रोख मालमत्ता व दर वर्षी १५ कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या चाव्या आपल्या हाती असाव्या, यासाठी बनकर-कदम यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष एप्रिल हिटमध्ये दिसू शकतो. १७ जागांसाठी दोन हजार मतदार असलेल्या या निवडणुकीला बाजार समितीसारखीच श्रीमंतीची झालर असेल. 

‘पिंमको’ पुन्हा होणार का बिनविरोध 

व्यापारी व लघु व्यावसायिकांची अर्थवाहिनी असलेल्या पिंपळगाव मर्चंट्स बँकेचे पडघम येत्या सहा महिन्यांत रंगणार आहे. पाच वर्षांपूर्वी सत्ताधारी गटाशी बंड करून आव्हान देणारे सुमतीलाल सुराणा आता हयात नाहीत. ‘पिंमको’वर अजूनही सुप्रिमो अशोक शाह यांचे वर्चस्व आहे. शाह व सोहनलाल भंडारी यांच्याशिवाय पिंमकोत पानही हलत नाही. साडेपाच हजार सभासदांपैकी मोठी व्होटबँक हाती असलेल्या शहा व सोहनलाल भंडारी यांच्या उत्कर्ष पॅनलला कुणी आव्हान देईल, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी झालेल्या बिनविरोधच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. मे महिन्यात पिंमकोच्या निवडणुकीचे बिगुल वाजू शकते. 

निफाड एज्युकेशन संस्थेत समीकरणे बदलणार 

पिंपळगाव शहरातील ब्रिटिशकालीन शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या निफाड एज्युकेशन संस्थेच्या निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत वेगळी समीकरणे असतील. गेल्या वेळी आमदार बनकर यांच्या गटाकडून लढलेले भास्करराव बनकर हे एकतर सत्ताधारी गटात दिसतील किंवा सवतासुभा मांडण्याची तयारी आहे. गेल्या वेळी कमी फरकाने व अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार बनकर यांच्या गटाला पाच, तर सत्ताधारी बाळासाहेब जाधव यांनी आठ जागा जिंकल्या होत्या. १३ जागांसाठी सतराशे मतदार कौल देतील. यंदा वारसाने सुमारे दोन सभासद वाढल्याने निवडणुकीचे गणिते बदलली आहे. ग्रामीण विरुद्ध पिंपळगाव शहर, असा संघर्षही पुन्हा एकदा दिसू शकतो. 


पिंपळगाव सोसायटीची रणधुमाळी रंगणार 

जिल्ह्यात सर्वांत २० कोटी रुपयांचे कर्जवाटप करणाऱ्या पिंपळगाव सोसायटीची रणधुमाळी यंदा रंगणार आहे. गत वेळीच्या आमदार दिलीप बनकर व भास्कर बनकर यांच्या एकत्रित पॅनलने सतीश मोरे यांच्या नवख्या उमेदवारांना धोबीपछाड दिली होती. बनकरद्वयींमध्ये राजकीय वितुष्ट आल्याने पिंपळगाव सोसायटीच्या निवडणुकीला वेगळी किनार असेल. १३ जागांसाठी एक हजार २०० सभासद मतदान करतील. दरम्यान, पिंपळगाव बाजार समितीसाठी विद्यमान संचालकांनाच मतदान व उमेदवारीचा अधिकार असणार आहे. 

जॉइंट फॉर्मिंग व खरेदी-विक्री संस्थेचाही संघर्ष टळणार 

गेल्या वेळी आमदार बनकर यांच्या अकरा समर्थकांना बिनविरोध निवडीची संधी मिळाली होती. सुमारे २५० सभासदांना त्यांच्या भागभांडवलानुसार जमीनक्षेत्र नावावर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने अवघे ५०० सभासद शिल्लक राहतील. जमीन वाटपाचा मार्ग मोकळा झाल्याने या संस्थेवर निवडून जाण्याचे आकर्षणही कमी झाल्याने येथेही निवडणुकीचा संघर्ष टळू शकतो. तिजोरीत नेहमीच खडखडाट असलेल्या पिंपळगाव खरेदी-विक्री संघात निवडणूक होईल की नाही, याची शंका आहे. रेशन दुकान, भाडेतत्त्वावरील गाळे एवढेच उत्पन्न असलेल्या खरेदी-विक्री संघात १५ जागांसाठी ८५८ सभासद कौल देतील. प्रतापराव मोरे यांच्या निधनानंतर आता कुणाची सत्ता येणार, एवढी मात्र उत्सुकता आहे. स्थापनेपासून भास्कर बनकर यांचे वर्चस्व असलेल्या समर्थ औद्योगिक वसाहतीत १३ जागांसाठी ४१५ सभासद मतदान करतील. सुमारे ४० लाख रुपये उत्पन्न असलेल्या या संस्थेत गत वर्षी निवडणुकीचा संघर्ष टळला होता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com