काय सांगता! गिलके, दोडके एक रुपया, तर काकडी दोन रुपये किलो? 

राम खुर्दळ
Saturday, 21 November 2020

आज काकडी, गिलके, वांगे मातीमोल विकायचे का? शेतकऱ्यांचे पीक रुपया आणि दोन रुपये दराने विकले जात असतील तर केंद्राचे बाजारमूल्य कुठं गेलं? असा प्रश्‍न करीत शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

गिरणारे (नाशिक) : पालेभाज्यांचे भाव बाजार समितीत घसरले आहे. गिलके, दोडके एक रुपये किलो दराने जाळी (२० किलो) २० रुपयाने, तर काकडीला दोन रुपये किलो भाव मिळाला. शेतकऱ्यांचे पीक रुपया आणि दोन रुपये दराने विकले जात असतील तर केंद्राचे बाजारमूल्य कुठं गेलं? असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आधी कोरोना आता अवकाळी 
कोरोना लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सातत्याने पिकांवरील रोगराई, तसेच मार्केट काही काळ बंद असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पश्‍चिम पट्ट्यात भात पिकाची वाताहात झाली आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असताना आता टोमॅटो, द्राक्ष पिकांवर अवकाळी परतीच्या पावसात नुकसान केले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी भाजीपाला पिकांचा आधार होता; पण तयार भाजीपाल्याचे भाव बघता दोन दिवसांपासून नाशिक बाजार समितीच्या उपबाजारात भाजीपाला मातीमोल भावाने विकला जातो आहे. भाजीपाला मार्केटपर्यंत आणण्याचा खर्चही भाजीपाला विकून मिळत नाही, अशी स्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

गिलके, दोडके एक रुपया, तर काकडी दोन रुपये किलो?

पालेभाज्यांचे भाव बाजार समितीत घसरले आहे. गिलके, दोडके एक रुपये किलो दराने जाळी (२० किलो) २० रुपयाने, तर काकडीला दोन रुपये किलो भाव मिळाला. काकडीची प्रत्येक जाळी (२० किलो) केवळ ४० रुपये भावाने विकली गेली. उत्पादनखर्च तर दूर; पण शेतातून तोडायला माल परवडत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांत संताप आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

आंदोलनाचा इशारा 
कोरोनात आर्थिक संकटात, नैसर्गिक संकटात मोडून पडलेल्या शेतकऱ्यांनी शेतीत मोठ्या कष्टाने, कर्ज, उसनवारी करून भाजीपाला पीक घेतली आहेत. दिवाळीच्या हंगामात आता माहेरी आलेल्या 
लेकी-बहिणींना सणाचे गोडधोड करण्याची कुवत शेतकऱ्यांची राहिलेली नाही. किमान बाजारमूल्यही मिळत नाही. आज काकडी, गिलके, वांगे मातीमोल विकायचे का? शेतकऱ्यांचे पीक रुपया आणि दोन रुपये दराने विकले जात असतील तर केंद्राचे बाजारमूल्य कुठं गेलं? असा प्रश्‍न करीत शेतकरी संघर्ष संघटनेने महामार्गावर भाजीपाला टाकून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

 
भाजीपाला आग्रा रोडवर टाकून आंदोलनाचा इशारा दिला. शेतकऱ्यांबाबत आंधळ्या-बहिऱ्याचे सोंग घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणी कळणार नाही. -नाना बच्छाव (कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती) 

 

भाज्यांचे भाव एवढे पडले आहे, की उत्पादनखर्च निघत नाही. शेतातील माल बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. -प्रभाकर वायचळे (ग्रामविकास संवाद मंच)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: expensive to break down agricultural products and vegetables nashik marathi news