VIDEO : "हाताला काम अन्‌ पोटाला रेशनही नाही"..हातावर पोट असणाऱ्यांची खंत

nashik hawkers.jpg
nashik hawkers.jpg
Updated on

नाशिक / पंचवटी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनचे चटके हातावर पोट असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसू लागले आहेत. एकीकडे व्यवसाय करण्यास मज्जाव अन्‌ दुसरीकडे सगळे बंद, यामुळे या वर्गाला हा दाह अधिक प्रमाणावर जाणवू लागला आहे. व्यवसायही ठप्प असल्याने खऱ्या अर्थाने या वर्गाची जगण्याची लढाई सुरू आहे. या काळात चटके सहन करावे लागत असलेल्या विविध स्तरांतील व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या व्यथा. 

व्यवसाय करणे कठीण 
पेठ रोडवरील मखमलाबाद शिवारात 20 वर्षांपासून मटण व चिकनचा व्यवसाय करतो. सध्या कोरोनामुळे बोकड व चिकन मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे ग्राहकही नाही. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या सहा मुलांसह 12 जणांचे कुटुंब चालवावे कसे, असा प्रश्‍न पडतो. व्यवसायासाठी ग्रामीण भागात बोकड घेण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे मटणासह चिकनचा तुटवडा आहे. मध्यंतरी ग्राहकांची चिकनवरील भावना उडाली होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना कोरोनाने डंख मारला. त्यामुळे स्वतःसह कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, मुलांची शिक्षणे कशी करावीत, ही विवंचना आहे. मालाच्या तुटवड्याच्या काळातही भाव स्थिर ठेवले. मात्र, ग्राहकच फिरकत नसल्याने जगणे अवघड बनले आहे. - जाकीर खाटीक, मटण व चिकन व्यावसायिक, पेठ रोड, पंचवटी 

घरी बसलो, तर खायचे काय? 
खरेतर मी दिवसभर मातीकाम करून उदरनिर्वाह करते. चार मुली व मुलाला मागे ठेवून माझे पती दहा वर्षांपूर्वीच देवाघरी गेले. तेव्हापासून जगण्याचा संघर्ष सुरू आहे. सध्या काम बंद असल्याने जगण्यासाठी काही दिवसांपासून फुलांची विक्री सुरू केली. मात्र, पोलिसांसह महापालिकेचे कर्मचारी इकडून तिकडे हुसकत असतात. पोलिस व अन्य यंत्रणांचा सासेमिरा चुकवत सकाळपासून फुले घेऊन बसते. मात्र, ग्राहकच नसल्याने खऱ्या अर्थाने जगण्याची भ्रांत सुरू झाली आहे. काम नसल्यामुळे व्यवसाय सुरू केला. ग्राहक नाही आणि दुसरीकडे रेशनवरही काही भेटत नाही. तेथे दहा दिवसांनी या, 15 दिवसांनी या, असे सांगितले जाते. त्यामुळे स्वतःसह मुलांच्या पोटाची खळगी भरावी कशी, असा प्रश्‍न पडला आहे. - मैनाबाई फुलवाले, फूल बाजार 
 
जगणे झाले अवघड 
मागील तीन पिढ्यांपासून उसाच्या रसाचा व्यवसाय करतो. चांगला व स्वच्छ रस देत असल्याने ग्राहकांचा विश्‍वासही संपादन केला आहे. मात्र, तीन आठवड्यांपासून लॉकडाउन असल्याने कुटुंबाच्या खर्चासह नोकरांचा पगार कसा द्यावा, असा प्रश्‍न पडला आहे. दूरवरून आणलेला ऊस खराब होत आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण कसे करावे, दैनंदिन खर्च कसा भागवावा असा प्रश्‍न पडला आहे. यंत्रणेने दिवसांतील किमान काही तास व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून थांबलेले अर्थकारण पुन्हा सुरू होईल. - मंगेश जगताप, रसवंतीचालक 

ग्राहक फिरकतच नाही 
तीन आठवड्यांपासून ग्राहक फिरकत नसून बेकरी चालवावी कशी, कारागीर सांभाळावे कसे, घरखर्च कसा करावा, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. बेकरीत आठ ते दहा माणसे काम करतात. त्यांना पगार द्यावा लागतो. ट्रान्स्पोर्ट बंद असल्याने कच्चा माल मिळणे अवघड झाले आहे. अनेक अडचणीवर मात करून कच्चा माल मिळवून मोठा माल तयार केला. मात्र, तो घेण्यासाठी ग्राहक येत नसल्याने व्यवसायाची चाके थांबली आहेत. - चंद्रेश ओहरा, संचालक, जैन बेकरी 

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच  

अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न 
प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनचा 21 दिवसांनंतर खऱ्या अर्थाने परिणाम जाणवू लागला आहे. मेडिकल व्यवसाय अत्यावश्‍यक सेवेत असल्याने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. सध्या नियमित ग्राहकांपेक्षा नवीन ग्राहकच येत आहेत. अन्य सर्वच व्यवसायांप्रमाणे लॉकडाउनचा फटका मेडिकल व्यवसायालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. योग्य ती काळजी घेत अधिकाधिक ग्राहकांना अत्यावश्‍यक सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. -नीलेश कोठारी, संचालक, महावीर मेडिकल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com