esakal | शेतकरी, व्यापाऱ्यांनाही रडवतोय कांदा..! भीतीचे वातावरण.. वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 4.jpg

जुलै उजाडला तरी बाजारात कांद्याची अपेक्षित भाववाढ झालेली नाही. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांना अखेर साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी बाहेर काढावा लागत आहे

शेतकरी, व्यापाऱ्यांनाही रडवतोय कांदा..! भीतीचे वातावरण.. वाचा सविस्तर 

sakal_logo
By
एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / पिंपळगाव बसवंत : जुलै उजाडला तरी बाजारात कांद्याची अपेक्षित भाववाढ झालेली नाही. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांना अखेर साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी बाहेर काढावा लागत आहे. साठवणूक केलेल्या कांद्याची प्रतवारी ढासळू लागल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. उन्हाळ कांद्याला अवघा 900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने यंदा कोरोनामुळे कांदा शेतकऱ्यांना रडविणार, अशी स्थिती आहे. 

कोरोनामुळे कांदा शेतकऱ्यांना रडविणार,
काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे दर प्रतिक्विंटल सरासरी 900 रुपये स्थिर आहेत. कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे आणि भाववाढीची लॉटरी लागली, तर निश्‍चितपणे चांगला फायदा मिळवून देणारे कांद्याचे पीक असल्याने चांदवड, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, निफाड आदी तालुक्‍यांतील शेतकरी नगदी पीक म्हणून उन्हाळ कांद्याची लागवड करतात. मात्र आता पूर्वीसारखी उन्हाळ कांद्याच्या उत्पन्नाची शाश्‍वती नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड करण्यात हात आखडता घेतला आहे. 
यंदा कमाल 1100, तर सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उन्हाळ कांद्याच्या हंगामात कांदाविक्रीची घाई न करता बहुतांश शेतकऱ्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये कांद्याच्या दराला लाली येईल, या आशेने कांद्याची चाळीत साठवणूक केली. यात व्यापाऱ्यांनीही सरासरी एक हजार रुपये दराने खरेदी केलेला कांदा स्टॉक केला. मात्र जुलै उजाडला तरी दर स्थिर असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी साठविलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा लागत आहे. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​


कांदा सडण्याची भीती 
उन्हाळ कांदा टिकाऊ असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. तीन महिन्यांचा कालावधी उलटल्याने साठविलेल्या कांद्याचा दर्जा ढासळत आहे. त्याला कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सडण्यापेक्षा मिळेल त्या भावात कांदा विकण्याकडे कल आहे. 

कांदा साठवणुकीची नवी पद्धत 
उन्हाळ कांदा साठवणुकीची नवी पद्धत व्यापाऱ्यांनी आणली आहे. आडवी पोळ लावण्याबरोबरच गोलाकार जाळीत यंदा कांदा साठविण्यात आला आहे. 25 क्विंटलपर्यंत साठवण क्षमता असलेल्या गोलाकार जाळीत हवा खेळती राहिल्याने कांदा अधिक टिकल्याचे व्यापारी सांगतात. शेतकऱ्यांनी मात्र पांरपरिक पद्धतीने चाळीत कांदा साठविला आहे. 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड