पोलिसांमुळे शेतकऱ्यांना मिळाले १० कोटी! बोगस खत-बियाणे विक्रीही पोलिसांच्या रडारवर   

विनोद बेदरकर
Tuesday, 6 October 2020

शेतकरी फसवणुकीचे प्रकार टाळण्याला ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च प्राधान्य दिले असून, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत बोगस बियाणे विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.

नाशिक : शेतकरी फसवणुकीचे प्रकार टाळण्याला ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च प्राधान्य दिले असून, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत बोगस बियाणे विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सोमवारी (ता. ५) कोरोना नियंत्रण आणि शेतकरी फसवणूक हे ग्रामीण पोलिसांचे प्राधान्याचे विषय असतील, असे स्पष्ट करीत पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी बोगस बियाणे -खत विक्रीत फसवणूक झाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

पोलिस अधीक्षक : शेतकरी फसवणुकीचे दहा कोटी मिळविण्यात यश 
पोलिस अधीक्षक पाटील सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. नवनियुक्त अधीक्षकांनी शेतकरी फसवणूक टाळण्यालाच प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. बोगस बियाणे आणि खते देऊन फसविले गेल्यास शेतकऱ्यांनी थेट १०९८ किंवा माझ्या ७७३८६००००१ या मोबाईलवर संपर्क साधावा, अशा शब्दांत शेतकऱ्यांना भरवसा दिला. शेतकरी फसवणूकप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी दहा कोटी रुपये परत मिळवून दिले. ७९ तक्रारींत गुन्हे दाखल करून घेतले. चेन स्नॅचिग, आर्थिक फसवणुकीच्या घटना टाळण्याचे प्रयत्न होतील. तसेच गुन्हे दाखल करून न घेणाऱ्या ठाणे अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. त्यामुळे पोलिस तक्रारीच दाखल करून घेत नाहीत असे यापुढे ऐकायला मिळणार नाही, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. 

पोलिस हेच कुटुंब, जबाबदारी माझीच 
श्री. पाटील म्हणाले, की जिल्ह्यात ३,७०० पैकी ३६९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण दहा टक्के आहे. पोलिस दल हेच माझे कुटुंब असून, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांसाठी दीडशे खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचे प्रयत्न आहेत. मालेगावची साथ आटोक्यात आली असली तरी जिल्ह्यात कोरोना प्रसार टाळण्यासाठी अनलॉक काळात विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. मास्क न वापरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

द्राक्ष उत्पादक ‘एसपी’ 
पाटील स्वतः द्राक्ष उत्पादक असून, सांगलीत त्यांनीही द्राक्ष शेतीचा आतबट्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे भूमिपूत्र विशेष पोलिस महानिरीक्षक आणि द्राक्ष उत्पादक एसपी हा योगायोग जुळून आल्याने फसणाऱ्या द्राक्ष, डाळिंब उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे, शेतकरी फसवणुकीच्या घटनांकडे गांभिर्याने पाहिले जाऊ लागल्याने शेतकरी तक्रारीसाठी पुढे येऊ लागले आहेत. गेल्या वर्षी अवघ्या २४ तक्रारी दाखल असलेल्या जिल्ह्यात यंदा वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच फसलेल्या शेतकरी तक्रारींची संख्या ५४५ इतकी झाली आहे. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

बोगस खत-बियाणे विक्रीही पोलिसांच्या रडारवर 
- जिल्ह्यात दहा टक्के पोलिसांना कोरोना 
- शेतकरी फसवणूक २०० तक्रारी वाढल्या 
- ग्रामीण पोलिसांसाठी कोरोना सेंटर करणार 
- कोरोनामुळे ५६ गुन्हेगार पॅरोलवर बाहेर  

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers got ten crore due to police nashik marathi news