
खरीप आणि रब्बी पिकांच्या माध्यमातून तागाची लागवड केली जाते. सध्या तागामुळे भाताची खाचरे पिवळे पिंताबर शालू पांघरल्यासारखी दिसत आहेत. ताग हे हिरवळीचे, तसेच आंतरपीक असल्याने शेतात वाळवून त्याची ‘बी’ काढली जाते. संबंधित बियाण्याला चार ते पाच क्विंटल असा दर मिळतो.
सुरगाणा (नाशिक) : जमिनीच्या सुपिकता वाढीसह शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीकरिता तालुक्यातील चिराई घाटमाथ्याच्या खालील गावांमधील मालगव्हाण, वांगण (मा), उंबरदे, पळसन, अलंगुण, पिंपळसोंड, उंबरपाडा (पिं), हातरुंडी, उंबरठाण, मेरदांड, आमदा (प), सुळे, राक्षसभुवन, पांगारणे, हडकाई चोंड, भोरमाळ, अंबाठा, डोल्हारे, रघतविहीर आदींसह अनेक गावांमधील शेतकरी आता आर्थिक उत्पादनाकरिता ताग पिकाकडे वळला आहे.
आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग
नाशिक जिल्हा हा द्राक्ष, कांदा पिकाकरिता जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. आदिवासी भागातील बोरगाव, हतगड परिसरात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. उन्हाळी लाल तुरीसह आदिवासी शेतकरी आपल्या आर्थिक वृद्धीकरिता आधुनिक शेतीचा अवलंब करीत आहेत. यामध्ये इस्त्रायल तंत्रज्ञानावर आधारित आंबा फळबाग, कारलीच्या बागा, भाजीचे कंदलागवड, डाळिंबलागवड यांसह दूध उत्पादनाकरिता पशुपालन, शेळीपालन असे विविध प्रकारचे नवनवीन प्रयोग करीत आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी विभागाच्या सहकाऱ्याने ताग शेतीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत ताग उत्पादन घेतले जात आहे.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी नागली, ज्वारी, वरई या शेतीला फाटा देत रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकाकडे वळत आहेत. आपल्या परिसरातील प्रगत आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा कित्ता गिरवत शेतकरी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. याकरिता कृषी सहाय्यक गुलाब भोये, हरी गावित, योगीराज धामोडे मार्गदर्शन करीत आहेत.
...असे घेतले जाते पीक
खरीप आणि रब्बी पिकांच्या माध्यमातून तागाची लागवड केली जाते. सध्या तागामुळे भाताची खाचरे पिवळे पिंताबर शालू पांघरल्यासारखी दिसत आहेत. ताग हे हिरवळीचे, तसेच आंतरपीक असल्याने शेतात वाळवून त्याची ‘बी’ काढली जाते. संबंधित बियाण्याला चार ते पाच क्विंटल असा दर मिळतो. खुल्या बाजारात प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे. वरई, नागलीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी ताग शेतीकडे वळत आहेत.
हेही वाचा > ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO
सुरगाणा तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आंबा, स्ट्रॉबेरी, कारली, टोमॅटो तसेच पशुपालन, पोल्ट्री व्यवसाय या आर्थिक लाभाच्या शेतीकडे वळत आहेत. अलीकडे तागाची शेती केली जात असून, बीजनिर्मितीमधून आर्थिक फायदा होत आहे. -प्रशांत रहाणे, तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा
हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना