
नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच्या काळात शासकीय आरोग्य यंत्रणेने पूर्ण सक्षमतेने परिस्थिती हाताळली. अशा संकटसमयी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी मात्र हॉस्पिटल्स, लेबोरेटरीज बंद ठेवत रुग्णांना सरकारी रुग्णालयांचा रस्ता दाखविला. मात्र, आता कोरोनाच्या स्वॅब चाचणीसाठी खासगी लॅबला परवानगी मिळताच खासगी हॉस्पिटल्सची "दुकानदारी' सुरू झाली असून, ऍडमिट होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची स्वॅब चाचणी करणे बंधनकारक केले जात आहे. चुकून एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाच, तर त्याला अव्वाच्या सव्वा दर आकारत, दाखल करून घेत सर्रासपणे लूट सुरू आहे.
"स्वॅब टेस्टिंग'च्या नावाखालीही रुग्णांची आर्थिक पिळवणूक
ठाणे येथील थायरोकेअर आणि मुंबईत झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही अशी "कट प्रॅक्टिस' सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन आठवड्यांपूर्वी इगतपुरीतील एक वृद्ध शरणपूर रोडवरील एका रुग्णालयात उपचारासाठी आले असता, त्यांची स्वॅबची चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात भरती करताना, सुरवातीला बेड नसल्याचे कारण देण्यात आले. नंतर बेड उपलब्ध करून देण्यात आला. याशिवाय, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचेही स्वॅब घेण्यात आले. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आठवड्यानंतर संबंधित वृद्धाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. याचप्रमाणे, महामार्गावरील नामांकित हॉस्पिटलमध्ये ताप असल्याने एक तरुण गेला असता, त्याचेही स्वॅब घेऊन, गोळ्या-औषधे देत घरी पाठविले. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावत कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऍडमिट करण्यासाठी बेड नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने हॉस्पिटलकडे स्वॅब घेतानाच बेड उपलब्ध नसणार हे का नाही सांगितले म्हणून वाद घातला; परंतु हॉस्पिटल प्रशासनाने हात वर करीत सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार, तो तरुण जिल्हा रुग्णालयात दाखल झाला.
कट प्रॅक्टिसकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
प्रातिनिधिक स्वरूपातील या दोन घटनांवरून शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोनाची चाचणी बंधनकारक केली असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी या हॉस्पिटल्सनी लॅबशी संगनमत करीत, "कट प्रॅक्टिस' सुरू केल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. या माध्यमातून अव्वाच्या सव्वा दर पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लावले जात असल्याचेही रुग्णांच्या नातलगांनी सांगितले. खासगी हॉस्पिटल्सच्या या कट प्रॅक्टिसकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होते आहे.
संकटसमयी रुग्णांची आर्थिक पिळवणूक
कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रातून वा हाय रिस्क रुग्ण असेल, तर त्याची कोरोनाची टेस्ट केली जाते. त्याशिवाय जर काही हॉस्पिटल्सकडून विनाकारण रुग्णांची टेस्ट केली जात असेल तर ते गैरच आहे. संकटसमयी रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणे चुकीचेच आहे. -प्रशांत देवरे, अध्यक्ष, आयएमए, नाशिक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.