''आरक्षण लढ्यातील पहिला वार माझ्या छातीवर'' - छत्रपती संभाजीराजे भोसले

sambhaji_20raje.jpg
sambhaji_20raje.jpg

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका असून, आरक्षणासाठी नेत्यांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकदिलाने लढ्यात सहभागी होताना दिल्लीत ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. छत्रपतींचा मावळा म्हणून आरक्षण लढ्यातील पहिला वार माझ्या छातीवर झेलण्यास तयार आहे, या शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी समन्वयकांना शनिवारी (ता.२६) आश्‍वासित केले. 

सरकारला खिंडीत गाठण्यासाठी रणनीती

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आंदोलनाला दिशा देण्यासाठी शनिवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक झाली. समन्वयकांना मार्गदर्शन करताना खासदार भोसले बोलत होते. ते म्हणाले, की अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करताना मराठा समाजाने आंदोलन केली. य आंदोलनाची दखल घेतली जाणार नसेल, तर आता दिल्लीत ताकद दाखविण्याची वेळ आली असून, ती आपण दाखविणारच. राज्यातील खासदारांनी दिल्लीत ताकद दाखविण्यासाठी दबाव वाढवावा. त्यासाठी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवावे. आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई सुरू ठेवताना दबावाचेही अस्त्र उपसले जाणार असून, सरकारला खिंडीत गाठण्यासाठी रणनीती आखली जाईल. 

केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याचे आवाहन

मराठा समाजाचा आता कुठल्याच सरकारवर विश्‍वास राहिलेला नाही. मागून मिळणार नसेल, तर कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरून गनिमीकाव्याने आंदोलन केली जातील. न्यायालयाने निकाल देताना समाजाची बाजू एकून न घेता आरक्षणाला स्थगिती दिली. आता स्थगिती उठविण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांनी सरकारवर दबाव आणावा. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून या वारशाला धक्का लागेल, असे कृत्य मी करणार नाही. सातारा असो की कोल्हापूर दोन्ही घराणे एकच आहेत. छत्रपती घराण्यात भांडणे लावण्याचा कोणी प्रयत्न करेल, तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रा. एम. एम. तांबे यांनी मंडल आयोगाने मराठा समाजाबाबत मांडलेले मुद्दे वस्तुस्थिती नाकारणारी असल्याचे सांगितले. अॅड. श्रीराम पिंगळे यांनी घटना दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याचे आवाहन केले. 

शासनाच्या आठ निर्णयांची होळी

नरेंद्र पाटील यांनी आंदोलनातून आता माघार नसल्याचे स्पष्ट केले. संजीव भोर, राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, किशोर चव्हाण यांच्यासह २८ जिल्ह्यातील समन्वयकांनी बाजू मांडली. नाशिक जिल्ह्याच्या वतीने सुनील बागूल व ॲड. शिवाजी सहाणे यांनी भूमिका मांडली. प्रारंभी वीस फूट लांब व १३० किलो वजनाच्या तलवारीचे अनावरण करण्यात आले. या वेळी शासनाच्या आठ निर्णयांची होळी करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते. 

पहिले प्राधान्य आरक्षणालाच! 

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले, की छत्रपती म्हणून पहिले प्राधान्य मराठा समाजाच्या आरक्षणालाच राहील. सारथी संस्थेचे अध्यक्षपद सांभाळायला आपल्याला नक्कीच आवडेल. क्रांती मोर्चात गट-तट नसल्याचे स्पष्ट करताना आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर समाजात भांडणे लावू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

बैठकीतील ठराव 

- २ ऑक्टोबरला आमदारांच्या घरासमोर आंदोलन 
- ५ ऑक्टोबरला राज्यात आंदोलन 
- मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत 
- राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेली निवड संरक्षित करा 
- शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख व इतर पिकांसाठी ६० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी 
- सारथी संस्थेला एक हजार कोटींचा निधी द्यावा 
- राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये १२ टक्के जागा वाढवाव्यात 
- विषयानुरूप तज्ज्ञांची समिती स्थापन करावी 
- राज्य शासनाने आरक्षणासाठी राज्यघटना दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवावा 
- शैक्षणिक शुल्काची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी 
- महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढा  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com