दोनशे वर्षांची परंपरा खंडित! इतिहासात प्रथमच कोटमगाव देवीची यात्रा रद्द

संतोष विंचू
Monday, 5 October 2020

मंदिर परिसरात असलेल्या मुख्य दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येणार असून कोणालाही आत सोडले जाणार नाही. शिवाय नाशिक - औरंगाबाद महामार्गावर गावातील प्रवेशद्वारावरही पोलीस बंदोबस्त ठेवून आत प्रवेश दिला जाणार नाही असे बैठकीत ठरले.

नाशिक : या भूतलावर जगदंबेची ५१ शक्तीपिठापैकी एक असलेल्या व श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वतीचे रुप असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेची नवरात्रोत्सवात भरणाऱ्या यात्रेला दोन-अडीचशे वर्षानंतर प्रथमच रद्द करण्याची वेळ आली आहे. शिवाय येथे या नऊ दिवसात दोन हजारावर भाविक येथे घटी बसतात मात्र ही परंपरा देखील यंदा खंडित होणार असून ट्रस्टमार्फत ऑनलाइन दर्शनाची सुविधा दिली जाणार आहे.

घटी बसण्याला ब्रेक, ट्रस्टतर्फे ऑनलाईन दर्शनाची सुविधा

उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचे आराध्य दैवत असलेली हे देवस्थान असून नवरात्रोत्सव येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विकलांगांना आधार देणारी, दुर्बलांना सबळ करणारी अन निशस्रकाला शक्ती देणारी हि माता असल्याने सर्वजण मातेच्या दर्शनाकरिता आतुर झालेले असतात. हे देवस्थान जगदंबा मातेचे स्वयंभू अधिष्ठाण असल्याने लाखो भाविक मातेपुढे नतमस्तक होतात. यात्रा काळात दोन ते तीन हजार भाविक येथे नऊ दिवस घटी बसतात. तसेच आबाल वृद्धांपासून तसेच गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वधर्मीय मनोभावे प्रार्थना करतात व आशीर्वाद घेतात.
 यंदा मात्र कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आजच्या बैठकीत यात्रा व दर्शन बंद ठेवण्याचा एक मुखाने निर्णय झाला. यामुळे इतिहासामध्ये पहिल्यांदा यात्रा होणार नसून यात्रेच्या माध्यमातून होणाऱ्या कोटीच्या उलाढालीला ब्रेक लागणार आहे. सहाजिकच हॉटेल्स, कटलरी, प्रसाद, हार, नारळ, फुले, मिठाईची व खेळण्या-सौंदर्यप्रसाधने दुकाने व रहाट पाळणे या व्यावसासिकांना याची झळ सहन करावी लागणार आहे.

असे आहे नियोजन...

या नऊ दिवसात देवी मंदिरात सकाळ व संध्याकाळी ट्रस्ट व पदाधिकाऱ्यांच्या पाच जणांचा उपस्थितीत आरती केली जाणार आहे. मंदिर परिसरात असलेल्या मुख्य दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येणार असून कोणालाही आत सोडले जाणार नाही. शिवाय नाशिक - औरंगाबाद महामार्गावर गावातील प्रवेशद्वारावरही पोलीस बंदोबस्त ठेवून आत प्रवेश दिला जाणार नाही असे बैठकीत ठरले. त्याचवेळी भाविकांच्या सुविधेसाठी आरती व देवी दर्शनाची युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे यांनी दिली.

हेही वाचा >  एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने अद्याप मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने येथे नवरात्रोत्सवात भरणाऱ्या जगदंबा मातेच्या यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
 या बैठकीला पोलीस निरीक्षक संदीप कोळी,नायब तहसीलदार श्री.राऊत, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राऊसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमणे, रामचंद्र लहरे, माजी सरपंच शरद लहरे, नानासाहेब लहरे, सतीश कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, पोलिस पाटील बाबासाहेब लव्हाळे, आप्पासाहेब चव्हाण, रोहित मढवई, इमाम काद्री, श्रावण ढमाले आदी उपस्थित होते.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेताना आम्हालाही खूप दुःख झाले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे.प्रवेश दिला जाणार नसल्याने भाविकांनी येथे येऊ नये. नवरात्रोत्सव काळात फेसबुक,युट्यूब व इतर माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देणार आहोत. - रावसाहेब कोटमे, अध्यक्ष, जगदंबा देवस्थान ट्रस्ट

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time Yatra of Goddess Kotamgaon canceled nashik marathi news