अभिमानास्पद! एकाच आदिवासी कुटुंबात पाच कोरोनायोध्दे; जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा

रविंद्र पगार
Monday, 28 September 2020

वैद्यकिय क्षेत्रात अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीपोटीया क्षेत्रात या कालावधीत सेवा करण्याचे नाकारले पण तालुक्यातील हे कुटुंबीय करत असलेल्या सेवे बद्दल कौतुकास पात्र ठरत आहेत.

नाशिक : (कळवण) सुरगाणा तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले शंभर टक्के आदिवासींची वस्ती असलेल्या सुकापूर गावातील एकाच कुटुंबातील आरोग्य सेवेत असलेले पाच डॉक्टर्स 'कोरोना योद्धे' आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांचे जीव वाचविण्याचे कार्य मुंबापुरीत गेल्या आठ महिन्यांपासून अहोरात्र करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे तालुक्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यात सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई महानगरातील केईएम, नायर व सायन हॉस्पिटलमध्ये सुकापूरचे युवराज चिंतामण दळवी, संगीता युवराज दळवी, कैलास चिंतामण दळवी, शानू कैलास दळवी तसेच योगेश किसन दळवी हे कोविड कक्षात स्वत:चा जीव धोक्यात घालून बाधितांवर उपचार करणे, त्याना धीर देणे, उपचारासह समुपदेशन करीत रुग्णांना रिकव्हर करणे आदी वैद्यकीय कामात अहोरात्र झटत आहेत. कोरोना काळात समाजाच्या संवेदना बोथट होत चाललेल्या काळात हे आदिवासी कुटुंबीय देत असलेल्या वैद्यकीय सेवेचे आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

सात ते आठ महिन्यात हे कुटुंबीय गावीही परतले नाहीत

वैद्यकिय क्षेत्रात अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीपोटीया क्षेत्रात या कालावधीत सेवा करण्याचे नाकारले पण तालुक्यातील हे कुटुंबीय करत असलेल्या सेवे बद्दल कौतुकास पात्र ठरत आहेत. मुंबईत पहिल्या टप्प्यात कोरोनाने हाहाकार माजवला असतांना हे कोरोनायोद्धे मागे हटले नाही किंवा ते स्वत:च्या गावीही परतले नाही. उलट सतत रुग्णसेवेत राहून दिवसरात्र कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्याचे कार्य विनातक्रार करीत आहेत.माघील सात ते आठ महिन्यात हे कुटुंबीय गावी देखील आले नाहीत.याचा आम्हा गाववासियाना अभिमान असल्याचे ग्रामस्थ कौतुकाने सांगतात.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

राज्यात कोविड-19 विषाणूचा संसर्ग वाढत आहे.संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर शर्थीचे प्रयत्न व उपाययोजना करत आहे. कोरोना युद्ध जिंकायचे या जिद्दीने पेटलेले डॉक्टर,परिचारिका, आरोग्यसेवक, सफाई कामगार, पोलीस बाधित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून देवदूताप्रमाणे झटत आहेत.- गुलाब गायकवाड, प्राथमिक शिक्षक.

आम्ही कुटुंबीय सेवा भाव वृत्तीने ह्या काळात आपल्या कामाप्रती प्रामाणिक रहात योगदान देत आहोत.याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.-.युवराज दळवी, केईएम मुंबई.

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five doctors from the same family are on corona duty nashik marathi news