सिमेंट दरातील चढ-उताराने व्यापारी हवालदील; अस्थिर दरामुळे ग्राहकही संभ्रमात

योगेश बच्छाव
Sunday, 11 October 2020

सिमेंटच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने व्यापारी हवालदील, तर ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. सिमेंट कंपन्यांच्या भूमिकेमुळे सिमेंट विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वितरक सांगतात. सिमेंट दर स्थिर नसल्याने ग्राहकही हतबल झाले आहेत. 

नाशिक : (सोयगाव) कोरोना संसर्गामुळे सात महिन्यांपासून बांधकाम व्यवसाय मंदीतून वाटचाल करीत आहे. त्यातच सिमेंट कंपन्यांच्या धोरणामुळे सिमेंट वितरक अडचणीत आले आहेत. सिमेंटच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने व्यापारी हवालदील, तर ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. सिमेंट कंपन्यांच्या भूमिकेमुळे सिमेंट विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वितरक सांगतात. सिमेंट दर स्थिर नसल्याने ग्राहकही हतबल झाले आहेत. 

दर स्थिर नसल्याने ग्राहकही संभ्रमात 

नाशिक जिल्ह्यात दोन ते अडीच हजारांहून अधिक सिमेंट वितरक आहेत. जेव्हा वितरकाने एखाद्या सिमेंट कंपनीकडे चारशे सिमेंट गोणीची ऑर्डर दिल्यानंतर वितरकाकडून त्याचे संपूर्ण पैसे भरून घेतले जातात. कंपनी मात्र ३५० पोती देऊन उर्वरित पन्नास पोत्यांची रक्कम ठेवून घेते. काही दिवसांनंतर ही रक्कम परत केली जात असली तरी सिमेंट वितरकांचे लाखो रुपये कंपनीकडे अडकून राहतात. त्यामुळे वितरकांना व्यवसाय करताना खेळत्या भांडवलासाठीही अडचणी येतात. आर्थिक बरोबरच अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. कंपनीकडे भरलेले पैसे तीन ते चार महिने मिळत नाहीत. त्यातच ३८० रुपये प्रतिगोणी सिमेंट खरेदी केल्यानंतर कंपनी ऐनवेळी ३४० रुपयांना विक्री करा, अशी सूचना करते. 

सिमेंट विक्रेत्यांवर अविश्वास

या दरात सातत्याने बदल होत असल्याने ग्राहकांचाही गैरसमज होतो. मोठी बांधकामे सुरू नाहीत. जी बांधकामे सुरू आहेत तीही संथगतीने, यामुळे सिमेंटची अधिक प्रमाणात मागणी नाही. सर्वसामान्य नागरिक सिमेंट खरेदीसाठी येतात तेव्हा त्यांना प्रश्न निर्माण होतो. कालचा दर वेगळाच असल्याचे ते ऐकून असतात. यातून सिमेंट विक्रेत्यांवर अविश्वास निर्माण होतो. दर बदलत असल्याने काही ग्राहक एका दुकानातून दुसऱ्या दुकानात चौकशी करतात. 

मागील नऊ महिन्यांतील सिमेंटचे दर 
(किंमत प्रत्येकी एक गोणी) 

जानेवारी : २८० रुपये 
फेब्रुवारी : २९० 
मार्च : २९० 
एप्रिल : २८० 
मे : ३७० 
जून : ३७० 
जुलै : ३६० 
ऑगेस्ट :३५० 
सप्टेंबर : ३४० 
ऑक्टोबर : ३३० 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

प्रत्येक विक्रेत्यांना सिमेंट विक्रीतून अत्यल्प दर मिळतो. सिमेंट कंपन्यांकडे लाखो रुपये अडकून राहत आहेत. विक्रीकर भरावा लागतो. त्यात सिमेंट कंपन्यांच्या मनमानी व चुकीच्या धोरणाचा विक्रेते व ग्राहकांनाही फटका बसत आहे. - अमोल पाटील (सिमेंट डीलर, हिरा एजन्सीज)  

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fluctuations in cement prices will hamper traders nashik marathi news