दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

अजित देसाई
Friday, 16 October 2020

ट्रकचालक धीरज दत्तात्रय चिखले (रा.आंबेगाव, मंचर) यास मारहाण करत त्याच्याजवळ असणारे एक हजार रुपये काढून घेत ही चौकडी फरार झाली. ट्रकचालकाने संगमनेर तालुका पोलीस पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार सांगितला.

नाशिक : (सिन्नर) अगोदरच मद्यधुंद असणाऱ्या चौघा मित्रांना आणखी दारू पिण्याची हौसे थेट तुरुंगात घेऊन गेली. नाशिक पुणे महामार्गावर ट्रक चालकास लुटणाऱ्या या चौकडीच्या वावी पोलिसांनी ई-चलनाच्या आधारे मुसक्या आवळल्या. लूटमार करणारे हे चौघे जण सिन्नर व संगमनेर तालुक्यातील आहेत. वाचा काय घडले?

ई-चलनावरून काढला पोलिसांनी माग

सुधीर संपत पवार (रा. मनोरी), राजेंद्र सन्तु शेळके (रा. नांदूर शिंगोटे), विवेक सुभाष लहाने (रा. सोनेवाडी) व योगेश रमेश घुगे (रा. निमोण) अशी या संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप आणि लुटलेले हजार रुपये हस्तगत केले आहेत. सुधीर पवार याचे मालकीच्या बोलेरो जीप (एमएच15/एफव्ही2218) मधून वरील सर्वजण गुरुवारी (ता.15) रात्री संगमनेर येथून नांदूर शिंगोटेकडे येत असतांना पुणे महामार्गावर सदर गुन्ह्याचा प्रकार घडला. अगोदरच मद्यधुंद असणाऱ्या या चौकडीने जवळ पैसे नसल्याने कऱ्हे घाटाच्या खाली असणाऱ्या डिझेल पंपावर जीपमध्ये उधारीत इंधन भरले. त्यानंतर घाट ओलांडत असताना आणखी मद्यपान करायची त्यांना लहर आली आणि क्षणात त्यांनी पुढे चालणाऱ्या (एमएच14/एएम0786) या ट्रकला थांबवले. ट्रकचालक धीरज दत्तात्रय चिखले (रा.आंबेगाव, मंचर) यास मारहाण करत त्याच्याजवळ असणारे एक हजार रुपये काढून घेत ही चौकडी फरार झाली. ट्रकचालकाने संगमनेर तालुका पोलीस पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार सांगितला. हा प्रकार वावी पोलिसांच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाल्यावर संगमनेर पोलिसांनी सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांना सूचित केले. 

साखरझोपेत असतांनाच आवळल्या मुसक्या
 
जीपचे वर्णन व नंबरवरून पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सदर जीपचा मालक दिंडोरी येथील असल्याचे समोर आले. मात्र दोन वर्षांपूर्वी ही जीप फायनान्स कंपनीने ओढून नेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या ई-चलन पोर्टलवर गाडीचा नंबर टाकल्यावर गेल्या वर्षी संगमनेर येथे चालकाकडून दंड भरला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे श्री.गलांडे यांनी वाहन चालकाचा फोटो आणि मोबाईल नंबर शोधून काढला. त्यासाठी मुंबई येथील तांत्रिक पथकाची मदत घेण्यात आली. ही माहिती मिळाल्यावर सुधीर पवार याचा शोध घेणे सोपे झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे साखरझोपेत असणाऱ्या सुधीरच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर एकामागे एक इतर तिघांना देखील ताब्यात घेण्यात आले. 

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

केवळ मद्याच्या नशेत गुन्हा केल्याची कबुली

पोलिसी खाक्या दाखवल्यावर या चौघांनी केवळ मद्याच्या नशेत गुन्हा केल्याची कबुली दिली. तेव्हा आपल्या दिवट्यांना पोलिसांनी का पकडून नेले याचा पालकांना उलगडा झाला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली जीप व लुटलेले एक हजार रुपये जप्त करत त्यांना सिन्नर न्यायालयात हजर केले. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपाधिक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.गलांडे, उपनिरीक्षक विकास काळे, अभय ढाकणे व सहकाऱ्यांनी अवघ्या आठ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.  

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for robbing truck driver nashik marathi news