चिंताजनक! श्वास घेण्यास त्रास अन् तडकाफडकी मृत्यूच...संसर्गाचा परिणाम...की आणखी काही?

suffocation.jpeg
suffocation.jpeg

नाशिक : कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेला चालताबोलता माणूस रस्त्याने फिरत असताना त्याचा अचानक मृत्यू होतो. जीव घाबराघुबरा होतो. जवळच्या दवाखान्यात कुणीतरी घेऊन जाते, उपचार मिळतात न मिळतात. पण, अर्ध्या-एक तासात प्राण जातो. दोन दिवसांत नाशिक शहरात अशा चार घटना घडल्या आहेत. हा विषाणू संसर्गाचा परिणाम आहे की आणखी काही, ही माहिती तातडीने मिळू शकली नाही. असे तडकाफडकी मृत्यू अंगावर काटा आणणारे आहेत, एवढे मात्र नक्‍की...

मृत्यूच्या चार घटना

रस्त्याने चालताना, गप्पा मारताना, घरात बसलेले असताना अचानक श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने मृत्यू झालेल्या ज्येष्ठांचे आणि दम्याच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. दोन दिवसांत रस्त्याने चालताना, घरात बोलत असताना अचानक त्रास वाढून चार मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. नाशिक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून महाजनपूर, भेंडाळी (ता. निफाड) येथील रामनाथ गणपत फड (वय 74) गुरुवारी (ता.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालले होते. अचानक रस्त्यातच त्यांना श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना आसपासच्या नागरीकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना

शुक्रवारी (ता.10) नाशिक शहरातही आणखी तिघांचे मृत्यू अशाच प्रकारे झाले. शुक्रवारी दुसऱ्या घटनेत संगीता सुभाष जाधव (वय 47, रा. शेषराव महाराज चौक, फुलेनगर) यांना गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास दम लागून श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

तिसरी घटना

साखराभाई काशीना अढांगळे (76, रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव) यांना शुक्रवारी दुपारी दोनला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

चौथी घटना

अंबड परिसरात घडलेली घटना अशी की, एकनाथ विठ्ठल सोनटक्के (67, रा. राणाप्रताप चौक, सिडको) यांना शुक्रवारी श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. श्‍वासोच्छवासाचा अचानक त्रास होत असताना चालता-बोलता अचानक रुग्णालयात नेण्यास वेळही न देता येणारे हे मृत्यू दम्याचे विकार असलेल्या कुटुंबासाठी चिंतेचे विषय झाले आहेत.

शहरातच नव्हे, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आणि साथरोगाच्या काळात लहान मूल आणि ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी सगळीकडे आटापिटा सुरू असताना भररस्त्यात आणि चालताबोलता होऊ लागलेल्या मृत्यूमुळे अनेक कुटुंबाच्या काळजाचा ठोका मात्र चुकला आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com