लष्करी अधिकाऱ्यांना कोटीचा गंडा; अनेक लष्करी अधिकारी फसले असल्याचा धक्कादायक खुलासा  

विनोद बेदरकर
Thursday, 1 October 2020

या आर्थिक फसवणुकीत अनेक लष्करी अधिकाऱ्यांना गंडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

नाशिक : नाशिक रोड येथील दोघांनी फ्यूचर फोर्च्यून कंपनीच्या नावाने गुंतवणुका गोळा करून लोकांना कुठलाही परतावा न देता सुमारे एक कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फ्यूचर फोर्च्यूनच्या नावाने सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीत अनेक लष्करी अधिकाऱ्यांना गंडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

लष्करी अधिकाऱ्यांना कोटीचा गंडा 
कर्नल आशुतोष पंढरीनाथ आढाव (वय ४९, गोस्वामी एन्क्लेव्ह तोफखाना) यांनी या प्रकरणी अरविंद ग्यानशंकर सिंग (वय ४२, कृष्णवंदन रो-हाउस गुलमोहर कॉलनी), राजेशकुमार विजयकुमार सिंग (३८, साईश्रद्धा अपार्टमेंट, पुष्पकनगर, लोखंडे मळा) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. कर्नल आढाव यांच्या तक्रारीनुसार, दोघा संशयितांनी संगनमत करून गुंतवणूकदारांना फ्यूचर ट्रेडिंग सोल्यूशन कंपनीविषयी चुकीची माहिती देऊन लोकांकडून गुंतवणूक स्वरूपात पैसे गोळा केले.

नाशिक-दोघांविरोधात गुन्हा दाखल 

चांगला परतावा देण्याच्या आमिष दाखविताना गुंतवणूकदारांना मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅडिंग व सिक्युरिटीपोटी धनादेश दिले. मात्र करारात ठरल्याप्रमाणे कुठलाही परतावा दिला नाही. फ्यूचर फोर्च्यून या नवीन फर्मचा धनादेश देत फसवणूक करीत आतापर्यंत सुमारे एक कोटी पाच लाख ७५ हजारांच्या आसपास आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिसांचे आवाहन 
फ्यूचर फोर्च्यून कंपनीच्या नावाने गुंतवणूक करून फसलेल्यांची संख्या मोठी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, पोलिसांनी फसलेल्या नागरिकांना आवाहन केले आहे. फसलेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक केदारे यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with military officers nashik marathi news

टॉपिकस
Topic Tags: