
नाशिकचे विनायकराव पाटील यांनी अनेक किस्से प्रसंग घटना यांनी आपल्या मैफिली गाजवल्या. याच किस्स्यांपैकी एक असाच मजेशीर किस्सा त्यांनी आपल्या "गेले लिहायचे राहून" या आपल्या पुस्तकात सांगितला आहे. हा मजेशीर किस्सा तुम्ही वाचलाच पाहिजे...
नाशिकचे विनायकराव पाटील यांनी अनेक किस्से प्रसंग घटना यांनी आपल्या मैफिली गाजवल्या. याच किस्स्यांपैकी एक असाच मजेशीर किस्सा त्यांनी आपल्या "गेले लिहायचे राहून" या आपल्या पुस्तकात सांगितला आहे. हा मजेशीर किस्सा तुम्ही वाचलाच पाहिजे...
शरद पवाराच्या पुलोद मंत्रीमंडळात युवा नेत्यांमुळे कधीकधी विनोदी किस्से सुद्धा घडायचे....
विनायकराव तेव्हा शरद पवाराच्या पुलोद मंत्रीमंडळात मंत्री होते. पुलोद म्हणजे पवारांचा गंमतीशीर प्रयोग म्हणून ओळखला जातो. यात जनसंघ, कम्युनिस्ट पार्टी पासून ते शेकाप पर्यंत वैचारिकदृष्ट्या टोकाच्या विरोधकांची मोट बांधून आघाडी बनवली होती. आयुष्यभर एकमेकाशी सामना केलेले पवारांच्या मंत्रिमंडळात एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसत होते. त्यामुळे अनेकदा गोंधळ उडायचे. स्वतः शरद पवार सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होते. तसेच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले अनेक तरूण होते. या युवा नेत्यांच्या मुळे कधीकधी विनोदी किस्से सुद्धा घडायचे. कॅबिनेट मिटिंग सुरु होती. विनायक पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र उर्दू अकादमीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली होती. त्यांच्या शेजारी बसणाऱ्या हशू अडवाणी आणि किसनराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. हशू अडवाणी हे जनसंघ म्हणजेच आताचे भाजपाचे मंत्री होते तर किसनराव देशमुख शेकाप पक्षाचे.
पण तुम्हाला उर्दूलिपी वाचता येते का?"
किसनराव देशमुखांनी विनायकरावाना विचारले," उर्दू अकादमीचे उपाध्यक्ष झालात तरी खरे पण तुम्हाला उर्दूलिपी वाचता येते का?" विनायक पाटीलांनी उलटा प्रश्न केला,"तुम्हाला येते का?"किसनराव देशमुख मुळचे मराठवाड्याचे. तिथल्या पूर्वीच्या निजामशाही व्यवस्थेमध्ये त्यांचे शिक्षण उर्दुमध्येच झाले होते. तसेच हशू अडवाणी हे पाकिस्तानमधून स्थलांतरीत झालेले सिंधी यामुळे त्यांचेही शिक्षण उर्दू मिडीयम मध्ये झाले होते. विनायक पाटलांचा देशमुखांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी देशमुखांना काही तरी उर्दूत लिहून दाखवण्याचे आव्हान दिले.
'तो' मजकूर वाचल्यावर शंकरराव चव्हाण आणखीन गंभीर
किसनराव देशमुखांनी एका साध्या कागदावर दोन ओळी उर्दू मध्ये खरडल्या आणि त्यांच्या हातात दिल्या. विनायाकरावांनी तो पहिला. त्यांना अक्षर सुंदर आहे एव्हढच कळत होत. त्यांनी किसनरावानी उर्दू बरोबर लिहिले आहे का चेक करण्यासाठी तो कागद हशू अडवानीना वाचायला दिला. हशूजींनी तो वाचला आणि मान डोलावली.मंत्रीमंडळातले अनेकजण मराठवाड्याचे होते त्यांना ही उर्दू वाचता येत होती. उत्सुकतेने सगळ्यांनी ती चिठ्ठी वाचली आणी पुढे पास केली. वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येत होती.पास होता होता ती चिट्ठी जेष्ठ मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पर्यंत पोहचली. मुख्यमंत्री असताना हेडमास्तर म्हणून ज्यांची प्रसिद्धी होती अशा शंकरराव चव्हाणांना देखील उर्दू वाचता येत होते.तो मजकूर वाचल्यावर त्यांची गंभीर मुद्रा आणखीन गंभीर झाली. चिठ्ठीची व्यवस्थित घडी करून ती त्यांनी जाकीटाच्या वरच्या खिशात ठेवली, चष्मा नाकावरून खाली सरकवला आणि विनायकरावांकडे पाहिले.
आणि विनायकरावांची भंबेरी उडाली..
विनायकरावांना कळाले आपली आता शाळा होणार आहे. कॅबिनेट मिटिंग संपली. शंकरराव चव्हाणांनी पाटलांना आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले. विनायकराव पाटील आता हेडमास्तरांची छडी खावी लागणार म्हणून खाली मान घालून गेले. शंकररावांनी गेल्या गेल्या त्यांची खरडपट्टी काढली. "कॅबिनेटमध्ये काय चाललं होत?" पाटलानी खांदे पाडले,"काही नाही साहेब" चिट्टी दाखवत चव्हाण म्हणाले, हे उद्योग करता कॅबिनेट मिटिंगमध्ये? हे महाराष्ट्राचं भवितव्य घडवणार व्यासपीठ आहे. इथलं गांभीर्य टिकवलचं पाहिजे. तुम्हा नव्या पिढीच्या मुलांना कसलंही गांभीर्य नसत. नॉनसिरीयस जनरेशन!!
"ये तेरा हसीन चेहरा, ये तेरी झीलसी आंखे...
विनायकरावाना काही कळेना की नेमकं असं काय झालय. ते फक्त "होय साहेब" एवढचं म्हणत होते. शंकरराव चव्हाण म्हणाले,"होय काय होय? गांभीर्याने काम करा. तुमच्या पिढीवर विसंबून आहोत आम्ही. आमची वय झालीत आता. या आता." विनायकराव घाम पुसत ती चिठ्ठी घेऊन केबिन मधून बाहेर आले. त्यांच्या पी ए ने विचारलं, "साहेबांनी कशासाठी बोलावलं होत?" पाटील म्हणाले,"ते नवीन जबाबदारी देत होते. मी म्हणालो विचार करून कळवू." विनायकराव तिथून तडक हशू अडवाणींच्या केबिन मध्ये गेले आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय हे वाचून दाखवायची विनंती केली. हशू अडवाणींनी मिश्कील हसत ती चिठ्ठी वाचली, "ये तेरा हसीन चेहरा, ये तेरी झीलसी आंखे, ये तेरे घुंघराले बाल, ये तेरी मरमरी बाहें.."पाटलांना ऐकताना फक्त हार्ट एटॅक येणे बाकी होतं.
संपादन -ज्योती देवरे