रानडुकरांच्या शिकारीच्या तयारीत असलेली नऊ जणांची टोळी जेरबंद; वनविभागाची कारवाई

प्रमोद पाटील  
Friday, 4 December 2020

वनविभागाला समजलेल्या गुप्त बातमी वरून त्यांनी या परिसरात धाड टाकली असता काही ठिकाणी जाळ्या लावलेल्या दिसल्या. शोधाशोध केली असता विभागलेल्या ठिकाणावरून नऊ आरोपींना रंगेहात पकडले. ​

चिचोंडी (नाशिक) : निमगाव मढ व महालखेडा (ता.येवला) गावाच्या शिवारातील मोरे यांच्या संयुक्त गटामध्ये रानडुक्कर या वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने आवश्यक साहित्यासह नऊ आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले. वनविभागाला समजलेल्या गुप्त बातमी वरून त्यांनी या परिसरात धाड टाकली असता काही ठिकाणी जाळ्या लावलेल्या दिसल्या. शोधाशोध केली असता विभागलेल्या ठिकाणावरून नऊ आरोपींना रंगेहात पकडले. दरम्यान आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

येवला तालुक्यातील महालखेडा - निमगाव मढ शिवारातील घटना
ताब्यात घेतलेल्या या शिकाऱ्याकडून शिकारीसाठी आवश्यक असलेले साहित्य आढळून आले. त्यांच्याकडून पाच मोटर सायकल, बारा जाळ्या व एक भाला जप्त करण्यात आलेला आहे. त्यांचे मेडिकल व गुन्हा नोंदवण्याची काम रात्री सुरू होते. अटक केलेले आरोपी दिंडोरी व कळवण तालुक्यातील असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

नऊ जणांच्या टोळीला वनविभागाने पकडले

आरोपीमध्ये देवराम अरुण चव्हाण (वय२८), गणेश रघुनाथ चौधरी (वय २९), गुलाब रामचंद्र पालवी (वय ३८ (सर्व राहणार कोल्हेर ता.दिंडोरी )साहेबराव हरी चौधरी (वय ४०), मोहन चंदर चौधरी (वय ३२), लक्ष्मण दत्तू चौरे (वय३३)(सर्व राहणार पिंपरी आंचला ता. दिंडोरी), पंडित हरी चौधरी (वय ४९), 
अनिल पुंडलिक चौरे (वय३९) (सर्व राहणार हींगळवाडी ता.कळवण), लक्ष्मण हरी मोंडे (वय २८) रा.अंबानेर ता. दिंडोरी असे अटक केलेल्यांची नावे आहेत. वरील सर्व आरोपी विरुद्ध वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

या कारवाई मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, वनरक्षक गोपाळ हरगांवकर, वनरक्षक पंकज नागपुरे,वनसेवक विलास देशमुख, सुनील भुरुक यांनी भाग घेतला. तसेच याबाबत उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महालखेडा येथील पोलीस पाटील सजन पवार, निमगाव मढ येथील पोलीस पाटील केशव लभडे उपस्तीत होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang arrested to hunt cattle nashik marathi news