गॅरेज व्यवसाय ठप्प..म्हणून काय झालं...मंदीत भैय्याने शोधली अनोखी युक्ती!

संतोष घोडेराव : सकाळ वृतसेवा 
शनिवार, 11 जुलै 2020

आपल्यातील कल्पक्तेला ज्ञानाचा साज चढवल्यास संकटातूनही मार्ग निघतो. याचा प्रत्यय आपणास समाजातील विविध घटनांतून नेहमीच येतो. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांचे स्वयंरोजगार बुडाले आहेत. अनेकांचा व्यवसाय, नोकरी अजूनही संकटात आहे. आपले कौशल्य वापरून मंदित संधी शोधून संकटावर मात केली आहे. ती कशी एकदा वाचाच... 

नाशिक / अंदरसुल : आपल्यातील कल्पक्तेला ज्ञानाचा साज चढवल्यास संकटातूनही मार्ग निघतो. याचा प्रत्यय आपणास समाजातील विविध घटनांतून नेहमीच येतो. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांचे स्वयंरोजगार बुडाले आहेत. अनेकांचा व्यवसाय, नोकरी अजूनही संकटात आहे. त्यामुळे बरेचजण हवालदिल झालेले असतानाच गॅरेजच्या व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या या भैय्याचा व्यवसायही ठप्प झाला. मात्र हार न मानता त्याने आपले कौशल्य वापरून मंदित संधी शोधून संकटावर मात केली आहे. ती कशी एकदा वाचाच... 

काळाची गरज ओळखून बदल 
अंदरसूल येथील भैय्या फिटरने दुचाकी दुरुस्तीच्या व्यवसायाबरोबर पिकावर औषध फवारणीसाठी लागणाऱ्या स्प्रे पंप दुरुस्तीच्या व्यवसायाची जोड देऊन नवीन रोजगार शोधल्याने स्प्रेपंप दुरुस्तीसाठी भैय्याच्या दुकानपुढे नंबर लागले असून अडचणीच्या काळातही फिरोज इनामदार (भैय्या) आपल्या कुटुंबाचा अधारवड बनला आहे. वडिलांचे पितृछत्र हरपल्यानंतर येथील भैय्याने वडिलांचाच असलेल्या पारंपरिक गॅरेज व्यवसाय सुरू केला खरा परंतू स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी भैय्याने एका व्यवसायावर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकरी हा पिकावर औषध फवारणीसाठी स्प्रे पंपचा वापर करताना दिसतोय. हीच काळाची गरज ओळखून भैय्याने औषध फवारणीसाठी लागणाऱ्या स्प्रेपंप दुरुस्तीची कला अवगत करून घेत स्प्रे पंप दुरुस्ती व्यवसाय सुरू केला. 
 

अन गॅरेज पुढे गर्दी 
या जोडधंद्यात भय्याने आपल्या कल्पक्तेला वाव देताना बाजारात असलेल्या बॅटरी स्प्रे पंप, हॅन्ड पंप, पेट्रोल स्प्रेपंप या तीनही पंपाची माहिती घेत पेट्रोल स्प्रे पंपचा वापर पिकावर औषध फवारणीसाठी जास्त प्रमाणात होत असल्याचे लक्षात घेतले. फोर स्ट्रोक, टू स्ट्रोक या स्प्रे पंपांची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात केली. अतिशय खात्रीशीर पद्धतीने भैय्याकडे स्प्रे पंपची दुरुस्ती होत असल्याने पंप दुरुस्तीसाठी भैय्याच्या गॅरेज पुढे नंबर लागले आहेत. 
 

भारतीय स्प्रे निर्मितीची गरज 
असे असताना सध्या शेतकरी वापरत असलेले पेट्रोल स्प्रे पंप हे सर्व चायना मेड असल्याने वस्तूला गॅरंटी मिळत नाही. पंपाचे स्पेअर पार्ट ही खूप महाग मिळत असल्याने दुरुस्तीसाठी ते परवड नाही. त्यामुळे भारतीय कंपनीने यासारखे स्प्रे पंप बाजारात आणले तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन पंप दुरुस्तीवर होणार खर्च शेतकऱ्यांचा वाचेल, असे मत भैय्याने व्यक्त केले. यापूर्वी वैजापूर, लासलगाव, येवला, विंचूर, निफाड आदी ठिकणी स्प्रे पंपची दुरुस्ती होत असल्याने अंदरसुल परिसरातील शेतकऱ्यांना पंप दुरुस्तीसाठी अडचणीचा सामना करण्याची वेळ येत होती. मात्र आता भैय्याच्या गॅरेजवरच स्प्रे पंपच्या दुरुस्तीचे महत्वाचे काम गावातच होत असल्याने शेतकरी बांधवांचा वेळ आणि पैसाही वाचला असून भैय्याचाही स्प्रे पंप दुरुस्तीच मुख्य धंदाच बनला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garage collapse but he stand up nashik yeola marathi news