नवीन अग्निशमन केंद्राला महासभेत हिरवा कंदील! मात्र 'या'विषयी प्रशासन धारेवर

प्रमोद सावंत
Friday, 29 January 2021

बल्लीपत्रा योजनेतील तीन हजारांच्या अनुदानावरील व्याज माफीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिका प्राथमिक शाळांत अनुकंपा तत्वावर शिक्षक भरतीचा ठराव मंजूर करण्यात आला असला तरी शासन मंजुरीशिवाय अंमलबजावणी करता येणार नसल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

मालेगाव (नाशिक) : शहराचा वाढता विस्तार, मध्यवर्ती भागात असलेले औद्योगिक क्षेत्र व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कमी क्षमतेचे चार अग्निशमन केंद्र करण्याचा प्रस्ताव गुरुवारी (ता. २८) महासभेत मंजूर करण्यात आला. यातील प्रस्तावित दोन जागांवर अतिक्रमण असल्याने ठराव झाला, मात्र अंमलबजावणी केव्हा याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. सभेत प्रभाग समितीचे अधिकारी, आरक्षित जमिनी खरेदी, कोविड केंद्रासाठी आरक्षित केलेल्या खासगी हॉस्पिटलला मोबदला देण्याचे धोरण, तसेच महापालिका प्रशासकीय इमारत व सहारा हॉस्पिटल कामाच्या चौकशीवरून सत्तारूढ व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. 

सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर 

प्रशासनाचे कामकाज, ठराव अंमलबजावणी, कामातील दिरंगाई, अतिक्रमण या प्रश्‍नांवर सदस्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २८) दुपारी चारला ऑनलाइन महासभेला सुरवात झाली. उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त त्र्यंबक कासार, प्रभारी नगरसचिव श्‍याम बुरकुल सभास्थानी होते. वॉर्ड २० मधील विकासकामांना मंजुरी देण्याच्या मुद्यावरून पाच लाखांच्या आतील कामे असूनही प्रभाग समितीऐवजी महासभेत का आणले, आमच्या अधिकारांवर गदा आणता आहेत का, असा सवाल डॉ. खालीद परवेज व माजीद युनूस यांनी केला. अखेर ठराव मंजूर करण्यात आला. कब्रस्ताननजीक जागा खरेदीसह विविध विकासकामांसाठी पाच वेगवेगळ्या भागातील जागा भूसंपादीत करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यातील काही जागांवर अतिक्रमण झाल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 

तांत्रिक बाबी पाहून निर्णय घेण्याचा ठराव

कोविड केंद्रासाठी आरक्षित केलेल्या खासगी हॉस्पिटलला मोबदला देण्याचे धोरण ठरविण्याच्या प्रस्तावावर शासन निर्णयानुसार रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षातील स्पिल ओव्हर कामांसाठी तरतुदीचा ठराव नस्तीबंद करण्यात आला. बल्लीपत्रा योजनेतील तीन हजारांच्या अनुदानावरील व्याज माफीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिका प्राथमिक शाळांत अनुकंपा तत्वावर शिक्षक भरतीचा ठराव मंजूर करण्यात आला असला तरी शासन मंजुरीशिवाय अंमलबजावणी करता येणार नसल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. आपापसात परस्पर संमतीने शिक्षक बदलींच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. तांत्रिक बाबी पाहून निर्णय घेण्याचा ठराव करण्यात आला. चार अग्निशामक केंद्र, अब्दुल्ला बीन मसूद, मर्चंटनगर, आवामीनगर या झोपडपट्टींना हायरपर्चेसवर घोषित करणे, सुवर्ण जयंती नगरोत्थान विकासकामे, विविध रस्ते, चौकांना नाव देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. 

हा प्रस्ताव तोडीबाजीसाठी आणला का? असा सवाल

सोमवार बाजारातील गाळेधारकांच्या ना हरकत दाखल्यावरील दुरुस्ती, मानधन कर्मचारी संख्या वाढविणे हे प्रस्ताव मंजूर झाले. चर्चेत उपमहापौर आहेर, रशीद शेख, सखाराम घोडके, सुनील गायकवाड, खालीद परवेज, अस्लम अन्सारी, माजीद युनूस, मदन गायकवाड, मुश्तकीम डिग्निटी, आमीन फारुख आदींनी भाग घेतला. आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात सदस्यांना माहिती दिली. महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत व महापालिका बीओटी तत्वावरील सहारा हॉस्पिटलच्या कामाची चौकशी करण्याचा प्रस्ताव चर्चेला येताच हा प्रस्ताव तोडीबाजीसाठी आणला का, असा सवाल मुश्‍तकीम डिग्निटी यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

प्रशासकीय इमारत चौकशीवरून खडाजंगी 

त्यावरून सत्तारूढ व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ज्येष्ठ सदस्य रशीद शेख यांनी डिग्निटी यांच्यावर तुम्ही तोडीबाजीत अग्रणी असल्याचा आरोप केला. हा वाद वाढतच गेला. अखेर महिन्यात उपायुक्त नितीन कापडणीस यांनी चौकशी करून कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General Assembly approves proposal for new fire station nashik marathi news