दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च

grand vehicle march from Nashik to Mumbai tomorrow in support of the farmers agitation in Delhi nashik marathi news
grand vehicle march from Nashik to Mumbai tomorrow in support of the farmers agitation in Delhi nashik marathi news

नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. २३) नाशिकहून किसान सभेतर्फे मुंबईकडे वाहन मार्च रवाना होईल. सोमवारी (ता. २५) सकाळी अकराला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा होईल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहतील. दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या किसान मार्चचे नेते माजी खासदार हनन मोल्ला हेही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनला राजभवनाकडे कष्टकरी कूच करतील आणि राज्यपालांना मागण्यांचे निवेदन देतील. 

किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राज्याचे अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, उपाध्यक्ष सुनील मालुसरे आदी उपस्थित होते. डॉ. ढवळे म्हणाले, की केंद्र सरकारने कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्यावे या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यास समर्थन म्हणून नाशिकमधून निघणाऱ्या मार्चमध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ. आय., एस. एफ. आय. यांच्यासह शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, तरुण सहभागी होतील. शनिवारी (ता. २३) सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्काम असेल. रविवारी (ता. २४) कसारा घाट उतरुन मार्च मुंबईकडे निघेल. 

प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाने सांगता 

प्रजासत्ताकदिनी (ता. २६) सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर ध्वजवंदनाने आणि राष्ट्रगीत गाऊन शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करुन महामुक्कामाची सांगता होईल. या मार्चमध्ये पन्नास हजार जणांचा सहभाग राहणार आहे, असे सांगून डॉ. ढवळे म्हणाले, की राज्यातील शंभरहून अधिक संघटनांतर्फे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे झेंड्याखाली मुंबईतील महामुक्काम आंदोलन होईल. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनाची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या पाच व्यासपीठातर्फे संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा तयार केला आहे. 
 

राज्य सरकारला आठवण देणार 

वाहन मार्च आणि महामुक्काम हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात आहे. पण त्याचवेळी महात्मा फुले कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरु करुन सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा याची आठवण राज्य सरकारला करुन देण्यात येणार असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान-गायरान-आकारीपड-बेनामी व वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा अशा मागण्या केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com