विकृत नातवाची करामत! आजोबांना संपवून रडण्याचे केले ढोंग; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

इसमाला फोटो दाखविल्यानंतर एका जागरूक नागरिकाने ओळखून मयत व्यक्ती ही धोंडेगाव येथील असून त्यांचा खून हा त्याच्याच नातवाने केला असावा अशी गोपनीय माहिती आडगाव पोलिसांना दिली.

नाशिक : विकृत नातवाच्या कारनाम्याने नात्याला काळीमा फासला. आजोबांच्या नरडीचा घोट घेतलेल्या या नातवामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीसात महिनाभरापूर्वी तक्रारही दिली होती. पण त्या तक्रारीच्या रागातून त्याने धक्कादायक प्रकार केल्याचे सोमवारी उघडकीस आले. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

गेल्या रविवारी संशयित आरोपी किरण याने रात्री आजोबा रघुनाथ यांना रात्री उशिरा घराबाहेर झोपलेले असतांना तोंडाला घट्ट चिकट पट्टी लावून तसेच हातापायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना मारुती ओमनीत टाकून क्रमांक (एम एच 15 इबी 3919) गाडी धोंडेगाव मार्गे मखमलाबाद येथून आडगाव शिवारातील ओढा गावात असलेल्या नाल्याकडे आणली व तेथे मृतदेह नाल्यात फेकला. दुसऱ्या दिवशी ओढाच्या नाल्यात एका वृध्द इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान खान यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे, दशरथ पागी, गणपत ढिकले, देविदास गायकवाड आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हा प्रकार हा घातपाताचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.  पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासाला यश आले वृद्ध इसमाचा खून झाल्याची खात्री पटली. आडगाव पोलिसांनी त्यानुसार सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढे तपास सुरु ठेवला. 

...म्हणून त्यांना संपविले

आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगून ते विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवले होते. नातवाच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रारही दिली होती. आजोबांनी तक्रार केल्याचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी किरण यांने त्यांचा खून केला.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

किरणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

नाल्यात वृद्धाचा मृतदेह सापडला म्हटल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मृतदेहाचा फोटो काढून या इसमाला कोणी ओळखते का? याबाबत माहिती जमा करत होते. इसमाला फोटो दाखविल्यानंतर एका जागरूक नागरिकाने ओळखून मयत व्यक्ती ही धोंडेगाव येथील असून त्यांचा खून हा त्याच्याच नातवाने केला असावा अशी गोपनीय माहिती आडगाव पोलिसांना दिली. या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी किरण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आजोबांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी किरणविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandfather killed by perverted grandson nashik marathi news