महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; चौदा हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

विक्रांत मते
Thursday, 29 October 2020

महापालिका आस्थापनेवरील चार हजार ७५५ कर्मचारी, अस्थायी दीड हजार अशा साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. 

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेचा आर्थिक गाडा गडगडला तरी कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रशासनाने दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांच्यात बुधवारी (ता. २८) झालेल्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला. महापालिका आस्थापनेवरील चार हजार ७५५ कर्मचारी, अस्थायी दीड हजार अशा साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. 

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दर वर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची परंपरा आहे. या वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने महापालिकेच्या महसुली खर्चात वाढ होणार आहे. त्याशिवाय कोरोनामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुली समाधानकारक होत नसल्याने दिवाळी सानुग्रह अनुदान मिळेल की नाही याबाबत अनिश्‍चितता होती; परंतु महासभेने यापूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव मंजूर केल्याने प्रशासनाला अंमलबजावणी करणे भाग होते. आयुक्त जाधव यांनी सात हजार रुपये अनुदान देण्यास संमती दर्शविली होती. महापौर कुलकर्णी यांच्यासह स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. आस्थापनेवरील चार हजार ७५५ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ६८९ अंगणवाडीसेविका, शंभर कंत्राटी कर्मचारी, ९३५ शिक्षकांना सानुग्रह अनुदान मिळेल. नोव्हेंबरच्या वेतनाबरोबर बॅंक खात्यात जमा होईल.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

 

आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी कोविड प्रादुर्भावाच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याने त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे कर्तव्य पार पाडले. 
-सतीश कुलकर्णी, महापौर 

कोरोनाकाळात चांगले काम केल्याने सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी आनंदाने याचा स्वीकार करून अधिक चांगले काम करावे. 
-कैलास जाधव, आयुक्त 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grant to NMC employees for Diwali nashik marathi news