जानेवारीत द्राक्षांचा गोडवा जिभेवर! निर्यातीचा टक्का वाढण्याची शक्यता 

एस. डी. आहिरे
Tuesday, 3 November 2020

नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या द्राक्षबागांचा गोड्या बहार म्हणजे फळधारणा छाटणी पूर्ण झाली असून, फुलोरा व द्राक्षमणी लगडण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्षबागा परतीच्या पावसाशी झुंज देत शेतकऱ्यांनी फुलविल्या आहेत. यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष जानेवारीत देश-परदेशातील खवय्यांच्या जिभेवर गोडवा देतील. 

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या द्राक्षबागांचा गोड्या बहार म्हणजे फळधारणा छाटणी पूर्ण झाली असून, फुलोरा व द्राक्षमणी लगडण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्षबागा परतीच्या पावसाशी झुंज देत शेतकऱ्यांनी फुलविल्या आहेत. यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष जानेवारीत देश-परदेशातील खवय्यांच्या जिभेवर गोडवा देतील. 

रोगांचे आक्रमण व मणी वाढ मंदावण्याची भीती
लांबलेला पाऊस वगळता अनुकूल वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या द्राक्ष छाटणी होऊन एक ते दीड महिना उलटला आहे. फुलोरा व मणी लगडलेल्या अवस्थेत बागा आहेत. प्रत्येक झाडावर ३० ते ४० घडांची संख्या आहे. लांबलेल्या पावसाने फारशी हानी झाली नसली तरी काही प्रमाणात डावणी रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यांचा परिणाम द्राक्षघडांचा दर्जा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची कसोटी लागणार आहे. डावणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे हात बांधले गेले आहेत. कारण अतिविषारी औषध फवारणी केली, तर निर्यातीसाठी पाठविण्यात येणाऱ्या नमुन्यात औषधांचा अंश आढळू नये, याची भीती आहे. थंडीची चाहूल लागल्याने रोगांचे आक्रमण व मणी वाढ मंदावण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोज औषध फवारणी करावी लागत आहे. गतवर्षी ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. गतवेळचे नुकसान भरून निघण्याबरोबरच अधिक दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 

निर्यातीचा टक्का वाढण्याची शक्यता 
विविध रोगांशी यशस्वी सामना करून खवय्यांच्या पसंतीला उतरतील अशी रसाळ, गोड द्राक्ष पिकण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. बागलाण परिसरात सप्टेंबरमध्ये फळधारणा छाटणी झाली आहे, तर निफाड, दिंडोरी, नाशिक परिसरात धोका न स्वीकारता शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये टप्प्याटप्प्याने छाटणी घेतली. बागलाण परिसरातून डिसेंबरच्या प्रांरभी द्राक्ष बाजारात दाखल होतील. निफाडमध्ये जानेवारीअखेर द्राक्ष काढणीला सुरवात होऊन खवय्यांचे तोंड गोड करतील. एकरी १०० क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे. तसे झाल्यास पंधरा लाख क्विंटल द्राक्ष नाशिकमधून देश-परदेशात पोचतील. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे यंदाचा कल पाहता निर्यातीचा टक्का गतवर्षाच्या तुलनेत वाढू शकतो. 

पावसाने काढता पाय घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. थंडीत येणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावाची भीती आहे. पण जिगरबाज शेतकरी कौशल्यातून निर्यातक्षम द्राक्ष फुलवतील. - जयराम मोरे (द्राक्ष उत्पादक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grapes will be available to the citizens in January nashik marathi news