esakal | अतिजोखमीच्या रुग्णांवर आरोग्य विभागाचा वॉच; रुग्णांशी संपर्क साधण्यास सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

corona nashik2.jpg

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना या अतिजोखमीच्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची तयारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केली असून, या आजारांच्या रुग्णांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.

अतिजोखमीच्या रुग्णांवर आरोग्य विभागाचा वॉच; रुग्णांशी संपर्क साधण्यास सुरवात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात महापालिकेला ८३ हजारांहून अधिक अतिजोखमीचे अर्थात कोमॉर्बिड रुग्ण शहरात आढळून आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना या अतिजोखमीच्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची तयारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केली असून, या आजारांच्या रुग्णांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.

पथकामार्फत महिनाभरात चार लाख ७० हजार घरांना भेटी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्याचे सध्या वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने यापूर्वी राबविलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचा उपयोग होत आहे. शहरात ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करत दोन टप्प्यांत मोहीम राबविण्यात आली होती. ७९४ पथकांद्वारे दररोज पन्नास घरांमध्ये भेटी देऊन अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण शोधण्यात आले होते. शोधलेल्या रुग्णांची माहिती ॲपमध्ये भरण्यात आली होती. पथकामार्फत महिनाभरात चार लाख ७० हजार घरांना भेटी देण्यात आल्या.

लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार

त्यात १७ लाख ५३ हजार नागरिकांची तपासणी करताना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा त्रास, यकृताचा आजार असलेले रुग्ण शोधण्यात आले. ८३ हजार १६९ अतिजोखमीचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अतिजोखमीचे आजार असलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिजोखमीच्या आजारांचे रुग्णांशी संपर्क साधून कोरोना संसर्गाविषयी माहिती विचारली जात आहे. लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत.

फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणी

हिवाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने महापालिकेने ३४ फिव्हर क्लिनिक सुरू केले असून, त्यात तपासणी सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांत ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या क्लिनिकमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. कोमॉर्बिड रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.