"फास्ट ट्रॅक'मधून नराधमाला कठोर शिक्षा ठोठवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

हिंगणघाटमधील हृदयद्रावक घटनेनंतर उपचार सुरू असलेल्या तरुण प्राध्यापिकेच्या निधनाने भीतीची गडद छाया पसरली आहे. घटनेतील दोषीला "फास्ट ट्रॅक'वर खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याची जरब बसेल, अशी अपेक्षा नाशिक शहर आणि जिल्हाभरातील प्राध्यापिकांनी हिंगणघाटच्या सुन्न घटनेनंतर "सकाळ'शी बोलताना व्यक्त केलीय. 

नाशिक : हिंगणघाटमधील हृदयद्रावक घटनेनंतर उपचार सुरू असलेल्या तरुण प्राध्यापिकेच्या निधनाने भीतीची गडद छाया पसरली आहे. घटनेतील दोषीला "फास्ट ट्रॅक'वर खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याची जरब बसेल, अशी अपेक्षा नाशिक शहर आणि जिल्हाभरातील प्राध्यापिकांनी हिंगणघाटच्या सुन्न घटनेनंतर "सकाळ'शी बोलताना व्यक्त केलीय. 

संतप्त प्राध्यापिकांची सरकारकडून अपेक्षा; हिंगणघाट जळीतकांडाने भीतीची गडद छाया 

राक्षसांना न्याय मागण्याचा हक्क कशाला? 
हैदराबाद पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाला यमसदनी पाठविले. त्यावर बरीच चर्चा झाली. पण न्यायालय हे माणसांसाठी असते. राक्षसांना न्याय मागण्याचा हक्क कशाला, असा प्रश्‍न तयार होतो. -प्रा. मनीषा ढोमसे, चांदवड 

कडक कायद्यासोबत हवी संस्काराची जोड 
महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले या सर्व प्रकरणांच्या मुळाशी विकृत विचारसरणी दिसते. त्यावर उपाय म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी हवी अन्‌ नैतिकतेचे धडे घरातून मिळायला हवेत. संस्काराचीही पेरणी व्हायला हवी. -प्रा. पूनम गोसावी, चांदवड 

ज्वलनशील पदार्थ बाटलीत नकोत 
प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान करायला हवा. अडचणीच्या वेळी बघ्याची भूमिका न घेता स्त्रीला सहकार्य केले पाहिजे. सरकारनेही पेट्रोल आणि ऍसिड याबद्दल अंमलबजावणी करावी. कायदा सांगतो, की बाटलीत पेट्रोल देऊ नका, मग अंमलबजावणी का होत नाही? -प्रा. भावना खिवंसरा, चांदवड 
 
कठोर शिक्षेतून श्रद्धांजली 

पीडित तरुणीला सरकारने न्याय दिला पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा देण्यातून तिला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल. तसेच महिलांवरील वाढते अत्याचार अजून किती सहन करायचे? -प्रा. कैंजन संघवी, चांदवड 

दुष्प्रवृत्तींच्या मुसक्‍या आवळाव्यात 
हिंगणघाटमधील प्राध्यापिकेवरील हल्ल्याची घटना सुन्न करणारी आहे. घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. चित्रपटांमधून शिक्षिकांविषयी दाखविल्या जाणाऱ्या आकर्षणामुळे कुठेतरी प्राध्यापिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागलेली आहे. अशा दुष्प्रवृत्तींवर वचक बसविणे आवश्‍यक आहे. -प्रा. ऐश्‍वर्या वडजे, ललितकला महाविद्यालय, नाशिक 

कायदेशीर कारवाई जलदगतीने हवी 
समाजातील विकृतींना आळा बसविताना, महिलांना असुरक्षित वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हिंसाचार, अत्याचाराच्या वाढत्या घटना बघता महिलांबद्दल आदराची भावना निर्माण होणे आवश्‍यक झाले आहे. दुष्प्रवृत्तींचा किंचितही त्रास सहन न करता, तातडीने तक्रार केल्यास व जलदगतीने कायदेशीर कारवाई झाल्यास जरब बसेल. -प्रा. डॉ. अंजली बेडसे, के. के. वाघ फार्मसी महाविद्यालय, नाशिक 

शाळा-महाविद्यालयांतून व्हावेत संस्कार 
समाजात दिवसेंदिवस विकृती वाढत चालली आहे. दु:खदायक गोष्ट ही आहे, की महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत. काहीही दोष नसतानाही महिलांचे संपूर्ण आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. अशा घटना थांबविण्यासाठी विकृत व्यक्‍तीस कडक शिक्षा झाली पाहिजे. शाळा- महाविद्यालयांतून चांगल्या वागणुकीसंदर्भातील संस्कार अधिक प्रभावीपणे रुजविणे गरजेचे आहे. - प्रा. सुरभी पाटील, के. के. वाघ फार्मसी महाविद्यालय, नाशिक 

महिला सुरक्षेची घेतली जावी काळजी 
हिंगणघाटमधील घटना संतापजनक आहे. सभोवताली उपस्थित नागरिकांनी अशा विकृत व्यक्‍तींना विरोध केल्यास महिलांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल. या घटनेतील दोषींवर कठोर व जलदगतीने शिक्षा सुनावत धाक निर्माण करावा. तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक सुधारणा कराव्यात. -प्रा. सोनाली शास्त्री, संदीप पॉलिटेक्‍निक 

सामूहिक जबाबदारीचे भान हवे 
समाजात महिलांवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा बसविणे आवश्‍यक झाले आहे. अशा घटनांमधील दोषींना या समाजात राहण्याचा काहीही अधिकार नाही. हिंगणघाटाची घटना दुर्दैवी असून, अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी पोलिस, सरकार व समाजाने सामूहिकरीत्या जबाबदारी स्वीकारावी. - प्रा. ऊर्मिला तांबट, संदीप पॉलिटेक्‍निक 
 
प्राध्यापिकेचा मृत्यू मानवापुढील आव्हान 
हिंगणघाटातील प्राध्यापिकेचे निधन ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. महिलांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद असे कितीतरी आपली श्रद्धास्थाने आहेत. मात्र आता देश विकृतीने वेढला गेलाय. समाजाला सुशिक्षित, सुसंस्कारी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्राध्यापिकेचा मृत्यू मानवापुढील आव्हान बनले आहे. आता लहानपणापासून घराप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांत संस्कार व्हावेत. कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. -प्रा. सीमा सोनवणे (भांडारकर), निफाड 

घटनेनंतर 24 तासांत मिळावा न्याय 
निर्भया, दामिनी, फुलराणी ही विशेषणे देऊन घटनेनंतर बळ देऊन "तारीख पे तारीख'मध्ये पीडितेला आणि समाजाला गुंतविण्यापेक्षा घटनेनंतर 24 तासांत न्याय मिळावा. पीडितांना होणाऱ्या यातना नराधमांना देण्यात याव्यात. सरकारने त्यादृष्टीने कायद्यात सुधारणा करण्यातून कर्तृत्वान महिला स्वच्छंद आकाशात झेपावत मोकळा श्‍वास घेईल. -प्रा. वृषाली जाधव गागरे-पाटील, पिंपळगाव बसवंत महाविद्यालय 

घरांमध्ये महिलांचा सन्मान रुजावा 
हिंगणघाट जळीतकांडाचा निषेध. अलीकडे नकार पचविण्याची-स्वीकारण्याची मानसिकता तरुणांमध्ये दिसत नाही. "प्रेम म्हणजे ओरबाडणं नाही, तर जपणं' ही उदात्त भावना दिसत नाही. घर, शाळा आणि समाज ही व्यक्तीची संस्कार केंद्रे आहेत. इथून जे मिळेल त्यातून व्यक्तीची जडणघडण होते. घरातून महिलेचा सन्मान रुजवायला हवा. मुले-मुली दोघांचेही समताधिष्ठित सामाजीकरण झाले पाहिजे. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तात्पुरता संताप व्यक्त केला जातो, परंतु गुन्हेगारास जलदगती न्यायालयांमधून तत्काळ शिक्षा मिळावी. म्हणजे अशा विकृत वृत्तींमध्ये कायद्याची दहशत निर्माण होईल. -डॉ. प्रतिभा जाधव, लासलगाव महाविद्यालय 
 
प्राध्यापिकेवरील हल्ला विकृत मनोवृत्तीचे दर्शन 
प्राध्यापिकेवरील हल्ला म्हणजे माणसाच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन आणि व्यवस्थेची शोकांतिका म्हणावी लागेल. अध्यापनात अजातशत्रू म्हणून काम करताना महिलेवरील हल्ला सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा आहे. हिंगणघाटच्या निर्भयाचा वेदनादायी अंत म्हणजे आपण कोणत्या शतकात आहोत, हा प्रश्‍न निर्माण करतोय. अत्याचाराच्या अशा कहाण्या घडत असल्याने अशी कृती करणारी वृत्ती जाळण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत. -प्रा. अंकिता मानेकर, एस.एन.डी. अभियांत्रिकी व एमबीए महाविद्यालय, बाभूळगाव, येवला 

अत्याचारातून असुरक्षितता अधोरेखित 
हिंगणघाटच्या घटनेने महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्यामधील असुरक्षितता अधोरेखित झाली. आतातरी कठोर पावले उचलत सरकारने प्रतिबंधात्मक कायदा करावा. त्यातून विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये धाक तयार होऊन महिला भयमुक्त होईल. ज्ञानदान करणारी प्राध्यापिका हिंसक वृत्तीचा बळी ठरली, हे सर्व बघून आईच्या कुशीत उमलत असणाऱ्या कळीची उमलण्याआधी आईला चिंता सतावते आहे. -प्रा. स्वाती सानप, एन्झोकेम कनिष्ठ महाविद्यालय, येवला 

नोकरदार महिलांनी घराबाहेर पडावे की नाही? 
हिंगणघाटच्या पीडितेचा मृत्यू संतापजनक आहे. नोकरदार महिलांनी घराबाहेर पडावे की नाही, असा माझा प्रश्‍न सरकारला व समाजाला आहे. महिला, मुली जाणाऱ्या रस्त्याने अनेक जण आजही टोळके करून बसलेले दिसतात. शेरेबाजी करतात. त्याच्या प्रतिबंधासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करावा. हिंगणघाटच्या घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. -प्रा. सुजाता रायजादे, स्वामी मुक्तानंद कनिष्ठ महाविद्यालय, येवला 

महिलांबद्दलची पुरुषी मानसिकता बदलावी 
हिंगणघाट घटना सुन्न करणारी आहे. महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत आहे. महिलांकडे पाहण्याची पुरुषी मानसिकता बदलायला हवी. सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडक करून अंमलबजावणी करावी. पीडिताला न्याय मिळण्यासाठी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी. -प्रा. सुनंदा जाधव, सिन्नर महाविद्यालय 

आम्हाला वाटू लागलीय भीती 
आम्हा प्राध्यापिकांना हिंगणघाटच्या घटनेने भीती वाटते. महिलांना स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे. हल्ली महिला-पुरुष एकत्रपणे काम करतात. स्वसंरक्षण करण्याबरोबर पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांत मुलांना, महिलांना सन्मान देण्याबाबतचे धडे द्यावेत. -प्रा. प्रणाली आहेर, सिन्नर महाविद्यालय 

देशात मानवता राहिली की नाही? 
हिंगणघाटच्या नराधमाने एकतर्फी प्रेमातून जाळलेल्या प्राध्यापिकेच्या निधनामुळे महिला आमची मालमत्ता आहे अशा पद्धतीने तिला वागवायचे काय, असा गंभीर प्रश्‍न समाजापुढे तयार झाला आहे. देशात मानवता राहिली की नाही? नीतीचा पाढा काय पुजण्यास ठेवला काय? शिक्षण घेतलेल्या प्रबोधन करणाऱ्या मुलींना आपला जीव मुठीत धरावा लागतो, तेव्हा सामान्य गरीब, अशिक्षित मुली महिलांचे काय? सरकारने अशा नराधमांना कायद्याच्या चौकटीत राहून फाशी द्यावी. तेही भर चौकात. त्यामुळे पुन्हा कुणाची हिंमत होणार नाही. -प्रा. जयश्री बागूल, सिन्नर महाविद्यालय 

महिला अत्याचाऱ्यांना कठोर शिक्षा हवी 
समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर घात करणाऱ्या विघातक प्रवृत्ती म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता. त्याचा नायनाट करावा लागेल. अन्याय व अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. -नीलिमा किशोर देशमुख, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, दिंडोरी 
 
महिला शिकली तरी ती सुरक्षित किती? 
महिला शिकली तरी ती सुरक्षित किती, हा गंभीर प्रश्‍न महिलांवरील अत्याचारातून गडद होतोय. अध्यापन, वकील, डॉक्‍टर, पोलिस अशा विविध क्षेत्रातील महिलांवरील अत्याचार कमी होताहेत काय, हा प्रश्‍न हिंगणघाटच्या घटनेने पुढे आलाय. महिलांनी कितीही प्रगत केली, तरीही तिची सुरक्षितता धोक्‍यात आहे. म्हणूनच पुरुषी मानसिकता बदलायला हवी. -प्रा. पूनम ठाकरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव 

हिंगणघाटच्या प्राध्यापिकेचा मृत्यू चटका लावणारा आहे. शिक्षित असो की सुशिक्षित महिला. तिच्यावरील अन्याय-अत्याचार थांबत नाहीत. प्रेम म्हणजे काय? त्यागाची अत्युच्च भावना प्रेमात दडलेली असते. एका मुलीचा बाप दुसऱ्या मुलीचा बळी कसा काय घेऊ शकतो, याचा समाजाने विचार करावा. 
डॉ. उषा शिरोडे, हिंदी विभागप्रमुख, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव 
 
ज्योत उजळण्याआधी मालवली 
मोठ्या जिद्दीने कोशाला तोडून फुलपाखराने बाहेर यावे. नव्या जोमाने, उमेदीने त्याने स्वबळावर पहिली झेप घ्यावी अन्‌ हपापलेल्या वटवाघळाने त्यावर झडप घालावी, असेच काहीसे हिंगणघाटच्या प्राध्यापिकेचे झाले. आयुष्यभर शिक्षिका म्हणून आदर्श जीवन जगण्याची ऊर्मी व देशाचे नवे भविष्य करण्याचे स्वप्न घेऊन तिने अध्यापनाची सुरवात केली. मात्र तिची ज्योत उजळण्याआधी मालवली. तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. निर्भया, प्रियंका आणि आता अंकिता, आणखी किती बळी हवेत? दोष द्यावा तर कोणाला? समाजाला, न्यायव्यवस्थेला की विकृत पुरुषी मानसिकतेला? 
-प्रा. टी. डी. काकुळते, सटाणा महाविद्यालय 

संशयिताला फासावर लटकवा 
विकृत मानसिकतेची बळी ठरली, हिंगणघाटची निष्पाप प्राध्यापिका. तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. देशात आतापर्यंत असंख्य महिला आणि युवतींवर अतिप्रसंग ओढावले. कोपर्डी, निर्भया यांचे गुन्हेगार जिवंत आहेत. घटनेनंतर वर्षानुवर्षे शिक्षा होत नसेल, तर अशा घटना वाढत राहणार. सरकारने "फास्ट ट्रॅक' न्यायालयात गुन्हा चालवावा. संशयिताला फासावर लटकवावे, हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल. 
-प्रा. एस. आर. देवरे, सटाणा महाविद्यालय 

चुकतेय कुठे? शोधणे आवश्‍यक 
नवरात्रोत्सवात देवी म्हणून पूजा करतो. आई म्हणून आदर, बहीण म्हणून रक्षण, पत्नी म्हणून प्रेम, मुलगी म्हणून जपवणूक करतो. मात्र तुमच्यासाठी अनोळखी असलेली महिला पुरुषत्वाची भूक भागवणारी भोगवस्तू असते का? संस्कारांचे धडे गिरवणे तिच्या माथी का? केव्हा थांबणार हे सर्व? चूक कोणाची यापेक्षा चुकतेय कुठे, हे शोधणे आवश्‍यक आहे. दुसऱ्यावर दुःख कोसळले आणि आपण निश्‍चिंत झालो, असे समजू नका. उद्या हे दुःख आपल्यावरही येऊ शकते, ही वेळ आपल्यावर येऊ शकते. 
-प्रा. पी. सी. सोनवणे, सटाणा महाविद्यालय 

विकृती ठेचायला हवीच 
हिंगणघाटची घटना अनेक बाबी अधोरेखित करून जाते. मुली, महिला आणि नोकरदार महिलांनी घराबाहेर पडायचे नाही का? मी ओझर ते मालेगाव रोज ये-जा करते. महिलांना प्रवासात अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. अशा घटनांमुळे पालक संभ्रमात पडतात. या प्रकारांमुळे दहशत निर्माण होते. पुरुषांनी मानसिकता बदलायला हवी. विकृती ठेचायलाच हवी. अशा गुन्हेगारांना लवकर फासावर लटकवले पाहिजे. 
-प्रा. वर्षा अहिरे, मसगा महाविद्यालय, मालेगाव 
 
मुलींनी सजग होऊन प्रतिकार करावा 
हिंगणघाटची घटना दुर्दैवी व क्‍लेशदायक आहे. विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर वचक बसायलाच हवा. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून एक वर्षाच्या आत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. मुलींनी सजग व्हावे. प्रतिकार करायला शिकावे. याबाबत समाजप्रबोधन झाले पाहिजे. कुटुंबीयांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत. मुलींना सक्षम करण्यासाठी निर्भय कन्या अभियानासारखे विविध उपक्रम राबवावेत. 
-प्रा. सपना सोनवणे, मालेगाव 

कायद्यातील पळवाटा कमी व्हाव्यात 
हिंगणघाटची घटना खालच्या स्तरावरची आहे. माणुसकी हरवली की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसत नाही. हिंगणघाटच्या घटनेत ज्या यातना युवतीने भोगल्या, त्या भयानक व क्‍लेशदायक आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा पुरेशी नाही. त्याला अधिक वेदना होतील, अशी शिक्षा मिळायला हवी. अशा विकृतीला समाजाने, कायद्याने, सरकारने आळा घातला पाहिजे. कायद्यातील पळवाटा कमी केल्या पाहिजेत. अशा प्रकरणांमध्ये सक्त व कठोर भूमिका हवी. पालक, शिक्षकांनी मुला-मुलींना समाजात प्रत्येकाशी सन्मानाने वागणे शिकविले पाहिजे. 
-प्रा. अभिलाषा शिंदे, मसगा महाविद्यालय, मालेगाव 

अत्याचाराकडे होऊ नये दुर्लक्ष 
मुली व महिलांवर अत्याचाराच्या ज्या काही छोट्या-मोठ्या घटना घडतात, त्याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने पाहत तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. तसे होत नाही म्हणून नराधमांची हिंमत बळावते. हिंगणघाटातील प्राध्यापिकेला मारणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून पुन्हा कोणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही. समाजातील अशी विकृत मनोवृत्ती वेळेवर ठेचणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. 
-प्रा. गीतल बच्छाव, कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, देवळा 

एकटीला बाहेर पडणे भीतिदायक 
विकृत घटना. अशा नराधमांना फाशीची शिक्षा तातडीने व्हायला हवी. सरकारने कठोर कायदा करून त्यांची लगेच अंमलबजावणी करत असे कृत्य करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीला रोखले पाहिजे. आता आमच्यासारख्या महिलांना एकटे बाहेर पडणे खूप भीतिदायक वाटते आहे. 
-प्रा. भारती गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा 
.. 
 
माणुसकीला काळिमा फासणारी घटना. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीऐवजी भरचौकात पेट्रोल टाकून जाळले पाहिजे, अशी संतापजनक प्रतिक्रिया मनात येते. पण कायदा हातात न घेता, सरकारने "फास्ट ट्रॅक' न्यायालयात खटला चालवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा. 
-प्रा. मीनाक्षी पवार, कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinganghat burn case Angry women professors expect from the government