कसबे सुकेणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

भरत मोगल
Sunday, 11 October 2020

परिसरातील लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरत आहे. त्याच परिसरात सोमवार ते गुरुवार चार दिवस रात्रीची थ्री फेज लाईट असल्याने लोकांना मोटार पंप चालू करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे लोकांना घराबाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे. 

नाशिक : (कसबे सुकेणे) परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम कायम आहे. रविवारी (ता. 11) पहाटे तीन वाजता मौजे सुकेणे येथील श्री दत्तात्रेय मोगल यांच्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय घोडा ठार झाला. मागील आठ दिवसात याच वस्तीच्या जवळपासच्या वस्त्यांवर कुत्रे देखील बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडले. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम असून वनविभागाने या परिसरात त्वरित पिंजरा लावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

अशी आहे घटना

रविवारी (ता. 11) पहाटे तीन वाजता श्री. दत्तात्रेय मोगल यांच्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय घोडा ठार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात जो घोडा ठार झाला तो घोडा मेंढपाळांचा असून काही दिवसापूर्वी हा घोडा हरविला होता. मात्र मेंढपाळ निघून गेल्यानंतर हा घोडा परिसरातच फिरत होता. लहान मुले घोड्यावर बसून फेरफटका देखील मारत होते. त्यामुळे या घोड्यावर सद्यस्थितीस कोणीही मालकी दाखवली नसली तरी वनविभागाला याबाबत कल्पना दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी येथे दाखल झाले. त्यांनी घोड्याचे पोस्टमार्टम करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. चांगला धष्टपुष्ट व मोठा घोडा बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडल्याने आजूबाजूच्या वस्तीवर दहशतीचे वातावरण आहे. परिसरातील लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरत आहे. त्याच परिसरात सोमवार ते गुरुवार चार दिवस रात्रीची थ्री फेज लाईट असल्याने लोकांना मोटार पंप चालू करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे लोकांना घराबाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

मागील काही दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात मुक्काम कायम असून परिसरातील अनेक कुत्री बिबट्याचा हल्ल्याला बळी पडली. आता बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना बघता वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा. - सतिश मोगल 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horse killed in leopard attack nashik marathi news