esakal | धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..
sakal

बोलून बातमी शोधा

nurse connection in igatpuri.jpg

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिचे पती व मुलगा भीतीपोटी कोणालाही न सांगता दहा वर्षांनी पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्‍यातील सोमज या मूळगावी आले. ते दोघेजण दिवसभर घरातच बसायचे आणि रात्रीचे घराबाहेर फिरायचे

धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इगतपुरी : कोरोनाला आटोक्‍यात आणण्यासाठी भारतातील डॉक्‍टर, नर्स व कर्मचारी जीव पणाला लावून काम करत असले तरी त्यांच्यासह कुटुंबीयांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचा पती व मुलगा इगतपुरी तालुक्‍यातील सोमज गावी आला. ते कोणालाही न सांगता दहा दिवसांपासून गावात राहत असल्याची बाब समोर आली.

असा घडला प्रकार..

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित व संशयित कोरोना रुग्णांवर रुग्णालयांमधील डॉक्‍टर, नर्स व कर्मचारी जीव पणाला लावून उपचार करत आहेत. ते रुग्णासह त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत असले तरी डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयच कोरोनाच्या सावटाखाली आहेत. 
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिचे पती व मुलगा भीतीपोटी कोणालाही न सांगता दहा वर्षांनी पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्‍यातील सोमज या मूळगावी आले. ते दोघेजण दिवसभर घरातच बसायचे आणि रात्रीचे घराबाहेर फिरायचे. त्यांची गावकऱ्यांना उशिरा चाहूल लागली. ही बाब सरपंचांना समजताच त्यांनी गावात नाकाबंदी केली. 
गावात नाकाबंदी केल्याची माहिती दोघांना मिळताच ते स्कॉर्पिओने मुंबईला जाण्यासाठी निघाले असता गावकऱ्यांनी त्यांना पकडले. दोघांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

मुलाचा आशावाडी, मोगरेत मुक्काम 
कोरोनाबाधित नर्सच्या मुलाने सोनज गावी आल्यानंतर आशावाडी व मोगरे गावास भेट देत नातेवाइकांकडे मुक्काम केला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, ते नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 

चार जण होम क्वारंटाइन 
कोरोनाबाधित नर्सचा पती, मुलगा सोमजमध्ये राहत होते त्या घरी दोन वयोवृद्ध व दोन तरुण राहत आहेत. आरोग्य यंत्रणेने खबरदारी म्हणून चौघांना होम क्वारंटाइन केले आहे. 

जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन
ग्राम समितीच्या माध्यमातून जी समिती नेमली होती त्यांनी याबाबत माहिती दिल्यावर त्वरित त्यांना वैद्यकीय पथकाने ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन केले आहे. - अर्चना पागिरे, तहसीलदार, इगतपुरी