लाचखोर कनिष्ठ अभियंत्‍याला कारावास; दंड ठोठावला 

अरुण मलाणी
Wednesday, 7 October 2020

जेलरोड परिसरातील तक्रारदार हे हौसिंग सोसायटीचे चेअरमन असून त्यांच्या सोसायटीत आठ नवीन वीज जोडणी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जुलै २०१६ साली वीज वितरण कंपनीच्‍या कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी दीपक चौधरी याने संबंधितांकडे २४ हजार रुपयांची लाच मागितली.

नाशिक : नवीन वीज जोडणी द्यायच्‍या मोबदल्यात तक्रारदाराकडून २४ हजार रुपयांची लाच प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला मंगळवारी (ता.६) शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी अभियंत्‍याला वर्षभर कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दीपक उल्हास चौधरी असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
जेलरोड परिसरातील तक्रारदार हे हौसिंग सोसायटीचे चेअरमन असून त्यांच्या सोसायटीत आठ नवीन वीज जोडणी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जुलै २०१६ साली वीज वितरण कंपनीच्‍या कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी दीपक चौधरी याने संबंधितांकडे २४ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची खात्री केल्‍यानंतर विभागाने सापळा रचला. २१ जुलै २०१६ ला लाचेची रक्कम स्वीकारताना चौधरीला रंगेहाथ पकडले व त्याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सहायक सरकारी वकील योगेश कापसे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. गुन्‍हा सिद्ध झाल्‍याने चौधरीस एक वर्ष सक्तमजुरी व हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imprisonment of corrupt junior engineer nashik marathi news