गॅस सिलिंडर वाहतूकदारांचा बेमुदत संप कायम; पुरवठ्यावर परिणाम

अमोल खरे
Monday, 5 October 2020

मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी, धोटाणे येथे इंडियन ऑइल कंपनीचा गॅस प्रकल्प आहे. येथून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो.

नाशिक/मनमाड : इंडियन ऑइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वाहतूकदारांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. संप मिटावा, यासाठी कंपनीत अधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली असून, संप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वाहतूकदारांच्या संपामुळे घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गॅस प्लँटमधून राज्याच्या विविध भागांत गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. 

राज्यातील विविध भागांत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी, धोटाणे येथे इंडियन ऑइल कंपनीचा गॅस प्रकल्प आहे. येथून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. त्यासाठी ट्रक वाहतूकसाठी निविदा काढली जाते. पानेवाडी येथील गॅस प्लँटमधून रोज गॅस सिलिंडर भरलेल्या ५४ गाड्या राज्यातील विविध ठिकाणी पाठवल्या जातात. एका गाडीत ३४२ सिलिंडर असतात, तर रोज १८ हजार, ४६८ सिलिंडर येथून सप्लाय केले जातात. हे सिलिंडर वाहतूक करणारे २७ ट्रान्स्पोर्टर आहे. मात्र या प्रकल्पातील काही अधिकारी मनमानी कारभार करून अपमानास्पद वागणूक देत असतात तसेच स्थानिकऐवजी बाहेरच्या वाहतूकदारांना सिलिंडर वाहतूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांनी करून शनिवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. अनेक वर्षांपासून प्रकल्पातून सिलिंडर वाहतुकीचे काम करत असताना आम्हाला डावलून बाहेरच्या वाहतूकदारांचा विचार केला जात आहे, हा आमच्यावर मोठा अन्याय असल्याचे वाहतूकदारांनी सांगितले. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

सिलिंडरचा तुटवडा होण्याची शक्यता 

याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची दोन वेळा भेट घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी आमचे ऐकून घेतले नाही. त्यामुळे संपाचे हत्यार उपसावे लागले असल्याचे नाना पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी सांगितले. वाहतूकदारांनी त्यांचे ट्रक उभे करून संप सुरू केला आहे, जर हा संप लवकर मिटला नाही, तर राज्यातील विविध भागांत केला जाणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प होऊन सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >  गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indefinite strike of gas cylinder transporters continues nashik marathi news