इंदूर-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा..हे आहे कारण.. 

अमोल खरे  : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 30 June 2020

मनमाडमधून गेलेल्या इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ, वाहतूक कोंडी, मोकाट जनावरांचा वावर व अतिक्रमण झाले आहे. यामुळे मार्गावर वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेमार्गाने शहराचे दोन भाग केले असून, पादचारी किंवा उड्डाणपूल नसल्याने नागरिकांना जीव धोक्‍यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. 

नाशिक : मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग व चांदवड- नांदगाव राज्यमार्ग गेला आहे. नागरिकांना हा रस्ता ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. अवजड वाहतुकीमुळे मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर स्थान फलक, सिग्नल, झेंब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक नसून, मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी होते. मालेगाव चौफुली ते ट्रेनिंग कॉलेजपर्यंत उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे. 

नागरिकांचा जीव धोक्‍यात 
महामार्गालगत छत्रे विद्यालय, एचएके, संत झेवियर्स, संत बार्णबा, रेल्वे कारखाना, उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालये, पोलिस ठाणे, चित्रपटगृह, न्यायालय, बसस्थानक, स्मशानभूमी, रेल्वेस्थानक, पेट्रोलपंप, विविध दुकाने, विहार, मंदिरे, मशिद असल्याने नागरिकांना भरधाव वाहने चुकवत रस्ता ओलांडावा लागतो. 

पादचारी पुलाची गरज 
रेल्वे प्रशासनाने रुळाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत बांधल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला आहे. महामार्गावरील एकमेव पुलावरून जीव धोक्‍यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतो. पुलावर फुटपाथ नसल्याने रस्त्याने चालावे लागते. पुलाला समांतर नवीन पादचारी पुलाची नितांत गरज आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

रखडलेला बायपासचा प्रश्‍न 
नागरी वस्तींचा विचार करून कुंदलगाव ते पानेवाडी ते अनकवाडे असा, तर चांदवडमार्गे येणारी वाहतूक वागदर्डी ते अनकवाडे आशा बायपासची मागणी आहे. बायपास मंजूर असतानाही फाइल अडकली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी हा प्रश्‍न मार्गी लावणे गरजेचे आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उड्डाणपूल आणि बायपास मार्गाची नितांत गरज आहे. -नीलेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते 

रेल्वेकडे मी पादचारी पुलाची मागणी केली आहे. खासदारांनी रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा करून पादचारी पूल उभारावा. -प्रकाश बोधक, माजी प्रभारी नगराध्यक्ष 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indore-Pune highway is becoming a death trap