साईभक्तांची जीप बनली काळ! औद्योगिक कामगाराचे दुर्दैव; कुटुंबाचा पालनकर्ताच हिरावला

अजित देसाई
Wednesday, 20 January 2021

नियतीपुढे कोणाचे चालत नाही हेच खरे. मोलमजुरी करुन बायकोही सुदामला संसाराचा गाडा ओढायला मदत करत होती. एकुलता एक मुलगा तोदेखील अपंग. घराचा मोठा आधार अन् कर्ता पुरुष सुदामच. मात्र काळ निष्ठूर अन् घडले तेच जे कधीच मनी ध्यानी नव्हते. एक घटना अन् घराचा कर्ता पुरुष झाला नजरे आड. 

सिन्नर (नाशिक) : नियतीपुढे कोणाचे चालत नाही हेच खरे. मोलमजुरी करुन बायकोही सुदामला संसाराचा गाडा ओढायला मदत करत होती. एकुलता एक मुलगा तोदेखील अपंग. घराचा मोठा आधार अन् कर्ता पुरुष सुदामच. मात्र काळ निष्ठूर अन् घडले तेच जे कधीच मनी ध्यानी नव्हते. एक घटना अन् घराचा कर्ता पुरुष झाला नजरे आड. 

अशी घडली घटना

बुधवारी (ता. 20) सकाळी 8.30 वाजेची वेळ. सुदाम सहादू संधान (वय 37) हा एटरनिस फाईन, मुसळगाव या कारखान्यात गेल्या 12 वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामास होता. सुदाम हा वावी इथला रहिवासी होता. सकाळी गावातील कामगार मित्राच्या दुचाकीवरून तो नेहमीप्रमाणे आशिर्वाद हॉटेलसमोर कामावर जाण्यासाठी उतरला होता. पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या गुजरातमधील साईभक्तांच्या जीपने (डीएन 09/ जे2598) त्याला धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरात असणाऱ्या अन्य कामगार व व्यावसायिकांनी जीप पकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. सुदाम यास उपचारासाठी सिन्नरला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे नेण्यापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर वावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

कौटुंबिक परिस्थिती हालाखीची

सुदाम यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी, भाऊ असा परिवार आहे. गावातील व्यवसायिकांकडे मजुरीचे काम केल्यावर त्याने त्या उत्पन्नात घर चालवणे अशक्य असल्याने एमआयडीसीची वाट धरली होती. त्याचा मुलगा जन्मतः अपंग असून एका जागेवर बसून असतो. पत्नी मोलमजुरी करते परंतु ती देखील सतत आजारी असते. दोन दिवसांपूर्वी तीला तपासणीसाठी आडगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिला ह्रदयविकार असल्याचे निदान करण्यात आले. अतिशय शांत, मनमिळावू व सतत हसतमुख असणाऱ्या सुदामच्या दुर्दैवी जाण्याने वावी परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An industrial worker was killed while crossing road nashik marathi news