शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणी चौकशीचे आदेश - छगन भुजबळ 

मोठाभाऊ पगार
Friday, 22 January 2021

प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यामार्फत आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.. 

कारवाई करण्याचे निर्देश
आरोग्य विभाग या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून (ता.22) सायंकाळपर्यत चौकशी अहवाल सादर करणार आहेत याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चौकशीचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुस-या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सुचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली...

एप्रिल ते मार्चपर्यंत नियमित स्वरुपात अंमलबजावणी

कोरोनाचे संकट आल्यामुळे मधल्या काळात जिल्ह्यातील कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाल. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून एप्रिल ते मार्चपर्यंत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येदेखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.

संबंधितांवर योग्य ती कारवाई - भुजबळ

यामध्ये ४१ महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करू असे देखील मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inquiry Shirasgaon Primary Health Center case said chhagan bhujbal nashik political news