पिंगळवाडे येथील जवान कुलदीप जाधव जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

या भागात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने प्रशासनाला दिली आहे. कुलदीप यांना आठ दिवसांपूर्वीच मुलगा झाला असल्याने त्याला पाहण्यासाठी ते रविवार (ता. २२)पासून सुटीवर गावी येणार होते. मात्र, मुलाला पाहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

सटाणा (नाशिक) : पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील रहिवासी व सध्या भाक्षी रोड, सटाणा येथे वास्तव्यास असलेले सैन्य दलातील जवान कुलदीप नंदकिशोर जाधव यांचा जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर ड्यूटीवर असताना मृत्यू झाला.

मुलाला पाहण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच

कुलदीप जाधव हे चार वर्षांपासून सैन्यात कार्यरत असून, जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये तैनात होते. या भागात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने प्रशासनाला दिली आहे. कुलदीप यांना आठ दिवसांपूर्वीच मुलगा झाला असल्याने त्याला पाहण्यासाठी ते रविवार (ता. २२)पासून सुटीवर गावी येणार होते. मात्र, मुलाला पाहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कुलदीप यांचे मूळगाव पिंगळवाडे असून, लहानपणापासून ते सटाणा शहरातील भाक्षी रोड परिसरात वास्तव्यास होते.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सोमवारी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कुलदीप जाधव यांचे वडील नंदकिशोर जाधव हे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून कळवण तालुक्यात कार्यरत आहेत. कुलदीप यांच्या मागे आई- वडील, पत्नी, आठ दिवसांचा मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, रविवारी (ता. २२) रात्री उशिरा किंवा सोमवारी त्यांच्या मूळ गावी पिंगळवाडे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawan Kuldeep Jadhav from Pingalwade died nashik marathi news