...अन् फोन करायला थांबायचं निमित्त झालं...मागून येऊन 'त्या' दोघांनी काही कळायच्या आतच साधला डाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास येवला बाजार समितीचे कर्मचारी पानसरे अनकाई येथील सहकाऱ्यांकडे जात होते. अनकाई फाट्याच्या पुढे ते फोन करण्यासाठी थांबले असतांना, अचानक पाठीमागून दोन मोटारसायकली आल्या. एकजण पुढे जाऊन थांबला, तर दुसऱ्या गाडीवरील दोघांनी त्याच्यावर चाकूने सपासप हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : (येवला) अनकाई व परिसरात बुधवारी (ता. 18) रात्री भररस्त्यात तिघांनी एकाला लूटमारीसाठी चाकूने भोसकल्याचा प्रकार घडला. सुदैवाने आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. 

अशी आहे घटना

येवला-मनमाड महामार्गावरून अनकाईकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव यांचा बंगला आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी मध्यरात्री दरोडा पडला होता. त्यानंतर दोनदा दरोड्याचा प्रयत्नही झाला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास येवला बाजार समितीचे कर्मचारी पानसरे अनकाई येथील सहकाऱ्यांकडे जात होते. अनकाई फाट्याच्या पुढे ते फोन करण्यासाठी थांबले असतांना, अचानक पाठीमागून दोन मोटारसायकली आल्या. एकजण पुढे जाऊन थांबला, तर दुसऱ्या गाडीवरील दोघांनी त्याच्यावर चाकूने सपासप हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आवाजाने जवळच असलेल्या बंगल्या बाहेर बसलेले बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव, बारकू देवकर, दिलीप वैद्य आदी धावून आले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरटे एका मोटार सायकलवरून पळून गेले. एक मोटारसायकल घटनास्थळीच पडून असल्याने ती पोलिसांनी ताब्यात घेतली. किशोर बोराडे यांच्या मदतीने डॉ. जाधव व सहकाऱ्यांनी थेट सावरगाव आणि अनकुटेपर्यंत पाठलाग केला, तसेच दोनशेवर ग्रामस्थांनी परिसर पिंजून काढला. मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक श्रीराम शिंदे आदींनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नाकाबंदी केली. मात्र, खेड्यापाड्याच्या रस्त्याने पळून जाण्यात चोरटे यशस्वी झाले. 

हेही वाचा > "शिपिंग इफिशिअन्सी'' घटल्याने 'कांदा' निर्यातदारांना भरली धडकी!

पोलिस जप्त केलेल्या मोटारसायकलच्या आधारे चौकशी करीत असून, अनकाईसह डॉ. जाधव यांच्या घराच्या आजूबाजूला नेहमीच घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.  

हेही वाचा > #WorldSparrowDay : स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेत वाढतोय 'चिवचिवाट'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack with one for robbery nashik marathi news